scorecardresearch

The Railway Men Review: भोपाळ दुर्घटनेवर बेतलेली आटोपशीर, अभ्यासपूर्ण अन् अस्वस्थ करणारी दर्जेदार सीरिज

The Railway Men Review: १८ नोव्हेंबरला ही चार भागांची मिनी सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे जी मुख्यत्वे भोपाळ गॅस गळतीवर अत्यंत निर्भीडपणे भाष्य करते

the-railway-men-review
सीरिज रिव्यू (फोटो : लोकसत्ता ग्राफीक टीम)

The Railway Men Review: गांधीजींना आपला आदर्श आदर्श मानणाऱ्याया देशात जीव घेणाऱ्याला शिक्षा व जीव वाचवणाऱ्याला शाबासकी कधीच मिळत नाही. या संवादाच्या माध्यमातून जी विडंबना आपल्यासमोर सादर करण्यात आली आहे ते पाहून आपला जीव नक्की गुदमरेल. खरंतर जगाच्या इतिहासातील सर्वात भयानक अशी औद्योगिक दुर्घटना (Industrial Disaster) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भोपाळ गॅस गळती’वर आजवर फारसं कुणी भाष्य केलं नाही हीदेखील एक विडंबनाच आहे. एक दोन कलाकृती सोडल्या तर कोणालाही यावर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करावंसं का वाटलं नाही हे एक न उलगडलेलं कोडंच आहे, परंतु आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द रेल्वे मेन’मधून याबद्दल बोललं जातंय हेदेखील फार महत्त्वाचं आहे.

१८ नोव्हेंबरला ही चार भागांची मिनी सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे जी मुख्यत्वे भोपाळ गॅस गळतीवर अत्यंत निर्भीडपणे भाष्य करते. २ डिसेंबर १९८४ साली ‘युनियन कार्बाइड’ या केमिकल फॅक्टरीमधून मिथाइल आयसोसायनेट (MIC) या विषारी वायूची गळती झाल्याने १५००० हून अधिक निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. या गॅस गळतीबद्दल तर या सीरिजमध्ये भाष्य केलं आहेच पण याबरोबरच त्या काळच्या सरकारचा निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, अमेरिकी लोकांना हाताशी धरून भोपाळच्या लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी रचलेलं षडयंत्र, राजकीय हेवेदावे, शासकीय कुचकामी यंत्रणा अशा वेगवेगळ्या विषयांवरही ही सीरिज प्रकाश टाकते.

leo-trailer
Leo Trailer: ‘जवान’ची दांडी गुल करणारा बहुचर्चित ‘लिओ’चा ट्रेलर प्रदर्शित; थलपती विजयचा जबरदस्त अंदाज, धांसू अ‍ॅक्शन अन्…
jyoti chandekar tharala tar mag
‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजी आहेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या आई, पाहा त्यांचे Unseen फोटो
thyroid & mind
Health Special: थायरॉईड ग्रंथी आणि मनाचा संबंध
parineeti chopra mangalsutra
परिणीती चोप्राचं मंगळसूत्र पाहिलंत का? बहीण प्रियांकाशी आहे खास कनेक्शन

आणखी वाचा : Naal 2 Review: भावा-बहिणीच्या हृदयस्पर्शी गोष्टीतून मोठ्यांनाही शिकवण देणारा ‘नाळ २’

गॅस गळती झाल्यावर या फॅक्टरीपासून काहीच अंतरावर असलेल्या भोपाळ जंक्शनची एक गोष्ट या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. कशाप्रकारे भारतीय रेल्वेची कर्मचारी मिळून भोपाळ जंक्शनवर त्या रात्री उपस्थित असलेल्या असंख्य लोकांचे प्राण वाचवतात यावर ही सीरिज बेतलेली आहे. याबरोबरच या गॅस गळतीनंतर भोपाळ जंक्शन हे जणू भारतीय नकाशावरुन गायब झाल्यासारखं चित्र निर्माण झालेलं असतानाही रेल्वे कर्मचारी, तिथले कामगार यांनी कशारीतीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सुखरूप आपापल्या घरी पोहोचवलं या गोष्टीवरच या सीरिजचा भर असला तरी या चार एपिसोडमधूनही सीरिज वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकते.

औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली सामान्य जनतेच्या प्राणांची, सुरक्षेची परवा न करणारी तत्कालीन सरकारी यंत्रणा, ‘युनियन कार्बाइड’सारख्या स्वार्थी विदेशी कंपन्या, जगण्यासाठी सुरू असलेली माणसांची धडपड, भ्रष्ट न्यायव्यवस्था अन् या गॅस गळतीमुळे भोपाळमधील पुढल्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागणारे परिणाम अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या सीरिजमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. भोपाळ जंक्शनचे स्टेशन मास्तर, एक नवाच नोकरीवर रुजू झालेला रेल्वे कामगार, ट्रेनमध्ये कित्येकांना लुबाडणारा एक चोर अन् एक इमानदार सरकारी रेल्वे अधिकारी असे चारजण मिळून त्या स्टेशनवरील प्रवाशांची कशाप्रकारे मदत करतात अन् तेदेखील या दुर्घटनेतून बाहेर पडतात का? हे सगळं तुम्हाला या चार एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

कथा आणि पटकथा अत्यंत वेगवान असल्याने हे चार एपिसोड कधी संपतात हे आपल्यालाही कळत नाही. शिवाय १९८४ च्या त्या काळात ही सीरिज तुम्हाला अक्षरशः खेचून घेऊन जाते. याबरोबरच सीरिजमधील काही दृश्यं तर हृदय पिळवटून टाकणारी आहेत. आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजतानाच गॅस गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईचं दृश्यं असो किंवा चौथ्या एपिसोडच्या सुरुवातीला गॅस गळती पीडित महिलेचा व्यंग मुलगा हे पाहून आपल्या काळजाचाही थरकाप उडतो. केवळ काही स्वार्थी विदेशी कंपन्या आणि त्यांना पोसणाऱ्या सरकारी यंत्रणेचे परिणाम साऱ्या भोपाळला भोगावे लागले हे दाहक वास्तव सीरिजमध्ये परखडपणे मांडण्यात आलं आहे.

सीरिजमध्ये केवळ भोपाळ जंक्शनमधील घटनेवरच जास्त लक्षकेंद्रित केलेलं आहे. यानंतर कशारीतीने तत्कालीन सरकारने ‘युनियन कार्बाइड’शी तडजोड करून ६१५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली, अन् एवढी मोठी रक्कम ५००००० पीडित लोकांमध्ये वाटली गेली तेव्हा प्रत्येकाच्या नशिबी जेमतेम २००० ते ३००० रुपयेच आले. या सगळ्या गोष्टींबद्दल विस्तृतपणे भाष्य केलेलं नाही. संवाद, सिनेमॅटोग्राफी, संगीत सगळ्याच बाबतीत सीरिज अव्वल आहे. याबरोबरच केके मेनन, आर माधवन, बाबिल खान, दिव्येंदू शर्मा. जुही चावला यांची कामं तर लाजवाब झालेलीच आहेत पण याबरोबरच इतर सहकलाकारांची कामंही चोख झाली आहेत. शिव रवैल यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असला तरी ते त्यात कुठेच कमी पडलेले नाहीत. एकूणच ‘भोपाळ गॅस गळती’सारख्या भयावह दुर्घटनेवर या सीरिजमधून फार उत्तमरित्या भाष्य केलं आहे. राजकीय तसेच सामाजिक बाजू दाखवतानाही सीरिजमध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, अगदी मोजकं अन् जे महत्त्वाचं आहे त्यावरच भाष्य करणारी ही सीरिज प्रत्येकानेच पाहायला हवी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netflix latest the railway men web series review in marathi avn

First published on: 21-11-2023 at 16:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×