नेटफ्लिक्सप्रेमींसाठी सप्टेंबर महिना खूपच खास असणार आहे. या संपूर्ण महिन्यात नेटफ्लिक्सवर १२ चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपट आणि सीरिजमध्ये कॉमेडीपासून अ‍ॅक्शन, सस्पेन्स, क्राइम आणि ड्रामा अशा विविध जॉनरचा कंटेंट पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, सप्टेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर कधी आणि काय रिलीज होणार आहे.

‘गांधारी’ – ३ सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका आईभोवती फिरते, जिच्या मुलीचं अपहरण होतं. या घटनेदरम्यान तिची दृष्टीही जाते. मात्र, मुलीला वाचवण्यासाठी ही आई परिस्थितीसमोर हार मानत नाही. दृष्टी गेल्यानंतरही ती मुलीच्या अपहरणामागे असलेल्या लोकांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. तिच्या या धाडसी लढ्याची थरारक कहाणी ‘गांधारी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

‘टर्निंग पॉइंट: जनरेशन ९/११’ – ९/११ हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण होत असताना ही डॉक्युमेंट्री या हल्ल्याचा पुढच्या पिढीवर झालेला परिणाम दाखवते. २ सप्टेंबरला ही रिलीज होत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये ९/११ हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांच्या अनुभवांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, या हल्ल्यानंतर ‘वॉर ऑन टेरर’शी संबंधित वार्तांकनातून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पत्रकारांशीही संवाद साधण्यात आला आहे. २५ वर्षांनंतरही ९/११च्या आठवणी आणि त्याचे परिणाम लोकांच्या आयुष्यावर कसे आहेत, ते यामधून पाहायला मिळणार आहे.

‘द जेंटलमॅन’ सीझन २ – ही ब्रिटिश क्राइम-कॉमेडी-ड्रामा सीरिज आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३ सप्टेंबरला हा सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

‘लवसिक’ – ही मेक्सिकन नेटफ्लिक्स ओरिजिनल सीरिज आहे. २ सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या सीरिजची कथा एमिलियाभोवती फिरते. डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सामाजिक बंधनांना झुगारून पुढे जाते. याच प्रवासात ती दोन पुरुषांच्या प्रेमात पडते आणि तिच्यासमोर प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि स्वातंत्र्य यापैकी एकाची निवड करण्याचं आव्हान उभं राहतं.

‘द हार्ड कॉर्प्स’ – हा अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट आहे. ३ सप्टेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा इराक आणि अफगाणिस्तान युद्धातून परतलेल्या एका माजी सैनिकाभोवती फिरते. या माजी सैनिकाला एका माजी चॅम्पियन बॉक्सरच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करण्यात येतं. मात्र, बॉक्सरच्या जीवाला धोका असल्याने त्याला केवळ सुरक्षा पुरवायची नसते, तर त्याच्यासाठी बॉडीगार्डची एक टीमही तयार करावी लागते.

‘चुंबक’ – ही हिंदी सीरिज आहे. १० सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या सीरिजची कथा मुंबईतील ‘चुंबक कॉलनी’मधील पाच शेजारी कुटुंबांभोवती फिरते. या कुटुंबांचं आयुष्य एकमेकांशी इतकं जोडलेलं आहे की, एका घरातील छोटासा प्रश्न संपूर्ण कॉलनीचा विषय बनतो. शेजाऱ्यांमधील नातेसंबंध, रोजच्या गमतीजमती, कौटुंबिक वाद आणि गॉसिपमधून निर्माण होणारा हा गोंधळ प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.

‘द ब्रेडविनर’ – हा अमेरिकन कॉमेडी चित्रपट आहे. ६ सप्टेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा नॅट विलकॉक्स नावाच्या एका वडिलांभोवती फिरते. त्याची पत्नी केटी घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळत असते. मात्र, तिच्या व्यवसायाला मोठं यश मिळाल्यानंतर तिला कामानिमित्त बराच काळ घरापासून दूर जावं लागतं. त्यामुळे नॅटवर आपल्या तीन मुलींची आणि घराची संपूर्ण जबाबदारी येते. घर सांभाळण्याचा फारसा अनुभव नसताना नॅट या नव्या भूमिकेत कसा रुळतो, याची मजेशीर कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

‘द टाइम ट्रॅव्हलर्स वाइफ’ – हा रोमँटिक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. ८ सप्टेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा हेन्री नावाच्या एका ग्रंथपालाभोवती फिरते, ज्याला एका अनुवांशिक विकारामुळे अनियंत्रितपणे टाइम ट्रॅव्हल करावं लागतं. त्याच्या या क्षमतेमुळे तो अचानक भूतकाळात किंवा भविष्यात पोहोचतो. हेन्री आणि त्याची पत्नी क्लेअर यांच्यातील प्रेमाच्या नात्यावर त्याच्या या टाइम ट्रॅव्हलचा परिणाम होतो आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.

‘फौदा’ सीझन ५ – ही इस्रायली पॉलिटिकल थ्रिलर-अ‍ॅक्शन सीरिज आहे. ‘फौदा’चा पहिला सीझन २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर या सीरिजचे चार सीझन आले आहेत. आता या सीरिजचा पाचवा सीझन ८ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

‘द परफेक्ट लाइ’ – ही सस्पेन्स सीरिज आहे. १० सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या सीरिजची कथा चार परफेक्ट कपल्सभोवती फिरते. मात्र, त्यांच्यापैकी एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर या चारही जोडप्यांना एकमेकांवर संशय येऊ लागतो. त्यांच्या सुखी आयुष्यामागे दडलेली गुपितं हळूहळू समोर येत जातात.

‘स्ट्रीकी पीट’ – ही क्राइम थ्रिलर सीरिज आहे. ९ सप्टेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या सीरिजमध्ये एका कॉन आर्टिस्टची गोष्ट पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी हा कॉन आर्टिस्ट आपल्या सेलमेटची ओळख स्वीकारतो. मात्र, दुसऱ्याची ओळख घेऊन जगताना त्याच्यासमोर कोणती आव्हानं उभी राहतात, याची थरारक कथा या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.