तुम्ही दर महिन्याला ओटीटीवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होण्याची वाट पाहत असाल, तर जुलै २०२६ मध्ये तुमच्यासाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर ‘प्रीतम अँड पेड्रो’पासून ते ‘इक्का’पर्यंत अनेक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या यादीत फक्त हिंदी चित्रपटच नाही, तर तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी अशा सर्व भाषांमधील सीरिज आणि चित्रपटांचा समावेश आहे.

प्रीतम एंड पेड्रो

दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिराणी ओटीटीवर पदार्पण करत आहेत. त्यांची पहिलीवहिली क्राईम थ्रिलर आणि कॉमेडी ड्रामा वेब सीरिज ‘प्रीतम अँड पेड्रो’ सीरिज ३ जुलै रोजी ‘जिओ हॉटस्टार’वर रिलीज होईल. यात अर्शद वारसी आणि वीर हिराणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सीरिजमध्ये मोना सिंग आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत.

इक्का

तुम्हाला कोर्टरूम ड्रामा पाहायला आवडत असेल, तर सनी देओल, अक्षय खन्ना, दिया मिर्झा आणि तिलोत्तमा शोम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘इक्का’ हा चित्रपट १० जुलै रोजी ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होईल. ‘दामिनी’ चित्रपटानंतर त्याला पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.

मर्डर 101

Murder 101 on OTT: ‘मर्डर १०१’ ही अमेरिकेतील अनेक दशकं जुन्या आणि न सुटलेल्या मर्डर केसवर आधारित एक लिमिटेड क्राईम इन्व्हेस्टिगेशन सीरिज आहे. ही सीरिज तुम्ही १३ जुलैपासून प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. या सीरिजमध्ये फक्त ३ एपिसोड्स असणार आहेत.

इसाकापटनम

‘इसाकापटनम’ ही वेब सीरिज १९९० च्या दशकातील गोष्ट सांगते. याठिकाणी नायडू नावाचा एक सामान्य माणूस डॉन बनतो. मात्र, त्याची मुलगी भारती लोकांच्या हक्कांसाठी स्वतःच्या वडिलांविरोधात उभी राहते, ज्यामुळे कथेत एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतो. ही सीरिज २ जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होईल.

मुथस्सी

मल्याळम वेब सीरिज ‘मुथस्सी’ ही लोककथांवर आधारित हॉरर आणि रहस्यमयी ड्रामा सीरिज आहे. ही केरळमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही सीरिज Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. यात केपीएसी लीला, अमित चकलक्कल, अखिला भार्गवन आणि ओरहान हैदर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सुपर सुब्बू

मल्लिक राम यांनी दिग्दर्शित केलेल्या सीरिजची गोष्ट एका अशा शिक्षकाची आहे, जो आपल्या वडिलांच्या कडक स्वभावापासून सुटका व्हावी, यासाठी धडपडत असतो. मग त्याला एका दुर्गम गावातील शाळेत ‘लैंगिक शिक्षण’ शिकवण्याची नोकरी मिळते. मजेशीर गोष्ट म्हणजे, जो शिक्षक इतरांना नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षणाचे धडे देत आहे, तो स्वतः व्हर्जिन असतो. मग सुरू होतो प्रेम आणि अनेक अजब-गजब परिस्थितींनी भरलेला एक मनोरंजक प्रवास. २ जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिजमध्ये संदीप किशन, मिथिला पालकर व मुरली शर्मा हे कलाकार आहेत.

एनोला होम्स 3

‘एनोला होम्स ३’ ही नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय ‘मिस्ट्री थ्रिलर’ फ्रँचायझी आहे. एनोला होम्सची आई अचानक गायब झाल्यानंतर ती स्वतः तिच्या शोधात निघते. या प्रवासात ती अनेक रहस्यांचा उलगडा करते. हा चित्रपट १ जुलैपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

द डेब्ट कलेक्टर

हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. यात एका माजी कर्ज वसुली एजंटची गोष्ट पाहायला मिळते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो आपल्या जुन्या गुन्ह्यांचे पश्चात्ताप होतात. मग तो त्या चुकांचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका धोकादायक मोहिमेवर निघतो. हा चित्रपट २३ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

राइड ऑर डाई

ही कथा डेबी क्लेबोर्न आणि जुडिथ बर्टन या दोन बेस्ट फ्रेंडची आहे. त्यांना वाटतं की त्या एकमेकींना ओळखतात. पण, जेव्हा डेबीला समजतं की जुडिथ ही एक इंटरनॅशनल किलर आहे, तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. याच दरम्यान, एका रहस्यमयी व्यक्तीच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात वादळ येतं. १५ जुलैपासून ही सीरिज तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकाल.