Nimisha Sajayan on weight loss journey: कलाकारांना त्यांच्या भूमिकांना न्याय देण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. कधी केस कापावे लागतात, कधी वाढवावे लागतात. पात्र वेगळ्या देशातील असेल किंवा भारतातील कोणत्या प्रदेशातील असेल, तर तेथील भाषा, पेहराव, बोलण्याचा लहेजा, संस्कृती, खाद्यपदार्थ, विशिष्ट सवयी अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण करावे लागते, अभ्यास करावा लागतो. जर भूमिका ऐतिहासिक असेल, तर त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यानुसार स्वत:मध्ये बदल करावे लागतात. त्याबरोबरच भूमिकेची गरज असेल, तर अनेकदा वजनही वाढवावे किंवा कमी करावे लागते. कलाकार भूमिका तितक्या प्रभावीपणे दिसण्यासाठी अशा अनेकविध गोष्टी करत असतात.

कलाकार त्यांनी एखाद्या भूमिकेसाठी नेमके काय प्रयत्न केले, स्वत:मध्ये काय बदल केले, याबद्दल विविध मुलाखतींमधून खुलासे करत असतात. आता अभिनेत्री निमिषा सजयनचे एक वक्तव्य चर्चेत आहे. नुकतेच एका सोशल मीडिया पोस्टमधून तिने भूमिकेसाठी वजन वाढवल्याचे सांगितले. अभिनेत्री बबिता सिंह रिपोर्टिंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सिनेमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

“सुरुवातीचे १० दिवस कदाचित सर्वांत कठीण होते”

अभिनेत्रीने ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ या सिनेमातील भूमिकेसाठी १४ किलो वजन वाढवले होते. तिचे आधी वजन ५२ किलो वजन होते, ते तिने ७२ किलोपर्यंत वाढवले. त्यानंतर वाढवलेले वजनही कमी केले. वजन कमी करण्याचा हा प्रवास तिच्यासाठी कसा होता याबद्दल तिने सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितले. तिने लिहिले की, सुरुवातीचे १० दिवस कदाचित सर्वांत कठीण होते. नीट झोप होत नव्हती, मूडमध्ये सतत बदल होत होते, प्रचंड थकवा आणि निराशा जाणवत होती. मी हे करू शकणार नाही, असं मला वाटायचं. काही वेळा माझ्या ट्रेनरसमोर बसून मी रडायचे. त्याला म्हणायचे की, मी हे अजून करू शकणार नाही.

तिने तिच्या ट्रेनरला टॅग करीत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि लिहिले, “तू नसतास, तर मी कदाचित हा प्रवास मधेच सोडून दिला असता. या संपूर्ण प्रवासात तू माझ्यासाठी खंबीर आधार होतास. जेव्हा मला प्रोत्साहनाची गरज होती, त्या त्या वेळी तू मला प्रोत्साहन दिलंस. मी हार मानत असताना तू मला संयमाने या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकवलंस. या सगळ्यात मी संघर्ष करीत होते, काही वाईट दिवसही होते, त्यावेळी तू मला जज केलं नाहीस. तू खंबीरपणे या प्रवासात माझ्याबरोबर होतास. असेही काही दिवस होते, ज्यावेळी माझी चिडचिड व्हायची, सगळं सोडून देण्याचे विचार यायचे; पण मी पुन्हा नव्याने प्रयत्न करावा यासाठी तू काही ना काही मार्ग शोधलेस. मागे वळून पाहताना हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता, याची जाणीव होते. संयम, होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य व्यक्ती तुमच्या बाजूला असण्याचा हा प्रवास होता. तुझ्या असण्यामुळे माझा हा प्रवास अधिक सोपा झाला. जेव्हा मी स्वत:वर विश्वास ठेवणं बंद केलं होतं, त्यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेवलास, त्यासाठी थँक्यू! तू सर्वोत्तम ट्रेनर, सर्वांत मोठा चीअर लीडर आणि सपोर्ट सिस्टीम आहेस. मी हे सगळं तुझ्याशिवाय करू शकले नसते”, असे लिहीत अभिनेत्रीने ट्रेनरचे आभार मानले.

दरम्यान, ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ हा सिनेमा २८ ऑगस्ट २०२६ ला अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.