Niti Taylor Alliance Show: अभिनेता कुणाल खेमू सूत्रसंचालन करत असलेला ‘अलायन्स’ हा रिॲलिटी शो चर्चेमध्ये आला आहे. ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणाऱ्या या शोमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. त्यामध्ये मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नीती टेलर सहभागी झाली असून, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे. यावेळी नीतीने तिच्या आधीच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला सिगारेटने मांडीवर चटके दिल्याचा अनुभव सांगत, त्या नकारात्मक आणि हिंसक नात्यातून पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, मिनी माथूर, रुही दोसानी व देलबर आर्या यांच्याशी गप्पा मारताना नीतीने तिच्या आधीच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला. यावेळी नीतीने एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या कथित अत्याचारांची आठवण सांगितली आहे. त्वचेवरील डाग दाखवत नीती म्हणाली, “माझ्या एक्स बॉयफ्रेंडने एकदा मला सिगारेटनं चटका दिला होता. तो हिंसक आणि मनोरुग्ण होता. एका रात्री तो वेडा झाला होता. त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता”

नीती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी तो सगळा अत्यंत वाईट अनुभव होता. त्यानं मला कानाखाली मारली आणि मी त्यावेळी फक्त, ‘गुड बाय, नंतर भेटू, असे म्हणाले होते. पण तेव्हा माझं वय कमी होतं. तेव्हा लोकांचे स्वभाव नीट समजत नाहीत; पण तो मनोरुग्ण होता. त्यानंतर मी नकारात्मक आणि हिंसक नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते नातं संपवलं.”

नीती टेलरने परीक्षित बावा याच्याशी २०१९ साली साखरपुडा केला आणि १३ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी लग्न केले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२४ मध्ये ते वेगळे होत असून घटस्फोट घेत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. मात्र, या अफवांवर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. याबाबत नीती म्हणाली, “जेव्हा तुम्ही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत नाही, तेच खरं उत्तर असतं. जर काहीच घडत नसेल, तर तुम्ही काय स्पष्टीकरण देणार.”

अभिनेत्री नीती टेलर ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. नीती हिने ‘कैसी ये यारियां’ मालिकेमध्ये नंदिनी मूर्ती ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आणि तिला घराघरांमध्ये ओळख मिळाली. यातील पार्थ समथान आणि नीती यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर तिने ‘इश्कबाज’, ‘गुलाम’, ‘बड़े अच्छे लगते हैं ३’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच वेब सीरिज, म्युझिक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरही तिची मोठी लोकप्रियता आहे.