Off Campus Season 2 : काही दिवसांपूर्वी ओटीटीवर ‘ऑफ कॅम्पस’ ही एक नवीन अमेरिकन सीरिज रिलीज झाली. जी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशा तिला डोक्यवर उचलून घेतलं. त्यातील पात्र, त्यांच्यातील मैत्री, प्रेम या सगळ्यामुळे या सीरिजने प्रेक्षकांना विशेष करुन तरुणांना अक्षरशा वेड लावलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही लोकप्रिय सीरिज लेखिका एले केनेडी (Elle Kennedy) यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सीरिजच्या मेकर्सने या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची नुकतीच घोषण केली आहे. खरं तर पहिला सीझन आल्यापासूनच दुसऱ्या सीझनची चर्चा होती मात्र आता अधिकृतपणे दुसऱ्या सीझनची घोषणा झाली आहे. ‘ऑफ कॅम्पस’ ही कॉलेजमधील मैत्री, प्रेम यावर आधारित आहे. पहिल्या पर्वात गॅरेट आणि हॅना यांची प्रेमकहाणी पाहायला मिळाली. तर आता दुसऱ्या सीझनमध्ये याच ग्रुपमधील त्यांचा मित्र डीन आणि मैत्रीण अॅली यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे.
दुसरा सीझन कधी प्रदर्शित होणार?
माध्यमच्या वृत्तानुसार ‘Off Campus’च्या दुसऱ्या सीझनचं शूटिंग १ जून ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. सर्व काम नियोजनानुसार झालं तर हा नवीन सीझन एप्रिल किंवा मे २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
पहिल्या सीझनमध्ये हॅना वेल्स आणि हॉकी कॅप्टन गॅरेट ग्रॅहम यांच्या प्रेमकथेवर भर होता. मात्र, दुसऱ्या सीझनमध्ये कथा नव्या जोडप्याकडे वळणार आहे. यामध्ये डीन डी लॉरेन्टिस आणि अॅली हेज यांच्या प्रेमकथेवर मुख्य फोकस असणार आहे. या भूमिका स्टीफन कॅलिन आणि मिका अब्दल्ला साकारणार आहेत. पहिल्या सीझनमध्येही त्यांनीच ही पात्र साकारली होती.
प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करत म्हटलं, “गॅरेट आणि हॅनानंतर आता डीन आणि अॅलीची प्रेमकथा ‘Off Campus’च्या दुसऱ्या सीझनमध्ये पुढे सुरू राहणार आहे.” त्यांनी यावेळी या दोन्ही ऑनस्क्रीन जोडप्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि प्रेक्षक त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या सीझनबद्दल उत्सुकता असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, दुसऱ्या सीझनचं शूटिंग नेमकं कुठे होणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पहिल्या सीझनचं चित्रीकरण Vancouverमध्ये झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या सीझनसाठीही टीम पुन्हा त्याच शहरात शूटिंग करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरिजची कथा बोस्टन परिसरात घडत असली, तरी कॅनडातील काही लोकप्रिय ठिकाणेही दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळू शकतात.
