Operation Safed Sagar trailer release : भारतीय जवानांच्या वीरतेचे प्रतीक असलेल्या कारगिल युद्धातील अनेक प्रसंग हे चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्येही शौर्याने दिलेला लढा आणि धैर्य यांचे चित्रण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यानंतर आता १९९९ साली झालेल्या या युद्धातील हवाई दलाचे शौर्य दाखविणारी आणखी एक कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शनिवारी ऑपरेशन सफेद सागर या सीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यामध्ये कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या सर्वांत कठीण लष्करी मोहिमांची कामगिरी दाखवण्यात आली आहे. या सीरिजची गोष्ट १९९९ मधील कारगिल युद्धातील एका मोहिमेवर आधारित असणार आहे. भारतीय हवाई दलाचे शौर्य आणि संघर्ष यांची माहीत नसलेली कथा सर्वांसमोर येणार आहे. त्यामध्ये एका मराठमोळी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरलादेखील मुख्य भूमिका साकारली आहे.
सिद्धार्थ व जिमी शेरगिल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेत
या सीरिजमध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘गोल्डन ॲरोज स्क्वॉड्रन’च्या शौर्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. त्याचे पूर्वी दोन टीझर रिलीज करण्यात आले होते आणि त्यानंतर आता ट्रेलर समोर आला आहे. तसेच सीरिजची रिलीज डेटही समोर आली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मिहीर आहुजा, अभय वर्मा व तारुक रैना हे भारतीय हवाई दलातील सर्वांत तरुण वैमानिकांच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. तर, सिद्धार्थ व जिमी शेरगिल हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये असून ते तरुण वैमानिकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि जगातील सर्वाधिक उंचीवर लढल्या गेलेल्या हवाई युद्धासाठी ते सज्ज होत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. तसेच यामध्ये इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळी आणि अभिनेत्री दिया मिर्जा झळकणार आहे.
थरारक युद्धांची दृश्यं, देशभक्तीची भावना आणि भारतीय हवाई दलाच्या शौर्याची झलक दाखविणाऱ्या या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘ऑपरेशन सफेद सागर’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ऑपरेशन सफेद सागर’ ही सीरिज ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सीरिजच्या या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत असून, नेटकऱ्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “माझ्या मते, हा ट्रेलर खरोखरच अंगावर शहारा आणणारा आहे.” दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “खूप दिवसांपासून वाट पाहत होतो.” सोशल मीडियावर या ‘ऑपरेशन सफेद सागर’ वेब सीरिजची चर्चा आहे.
