OTT Inspiring Series : ओटीटीमुळे आता घरबसल्या विविध प्रकारच्या कलाकृती अगदी सहज पाहता येतात. ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्मवर फक्त थ्रिलर, रोमान्स किंवा कॉमेडी सीरिज अन् सिनेमे पाहायला मिळतात, असं नाही, तर अनेक प्रेरणादायी कलाकृतीसुद्धा आहेत. त्या प्रत्येक सीरिजमधून शिकण्यासारखं आहे.
अशा प्रेरणादायी सीरिजच्या शोधात असाल, तर ओटीटीवरील अशा खास सीरिज आहेत, ज्यामुळे तुमचा आयुष्यात विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. ओटीटीवर तेच तेच पाहून कंटाळले असाल, तर खालील सीरिज नक्की बघा.
1) Kota Factory
जितेंद्र कुमारची मुख्य भूमिका असलेली ‘कोटा फॅक्टरी’ ही सीरिज प्रेरणादायी सीरिजच्या यादीतली सर्वांत लोकप्रिय आहे. आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांच्यावर असलेला अभ्यासाचा ताण आणि स्वप्नं पूर्ण करतानाचा संघर्ष यातून दाखवला आहे. तसेच कॉलेजमधील प्रेम, मैत्रीही यामधून पाहायला मिळते. ही सीरिज एक महत्त्वाचा संदेश देते तो म्हणजे, अपयश म्हणजे शेवट नाही. त्यातूनच आणखी एक नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडू शकतो. ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातील या सीरिजचे सर्व सीझन Netflix वर उपलब्ध आहेत.
2) Aspirants
यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संघर्ष कहाणी ‘अॅस्पिरंट्स’ या सीरिजमध्ये दाखवली आहे. मित्रांची मैत्री, अभ्यासातील स्पर्धा आणि आयुष्यातील चढ-उतार यांचा वास्तववादी प्रवास यात पाहायला मिळतो. प्रत्येक भाग प्रेक्षकांना त्यांच्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याची प्रेरणा देतो. Amazon Prime Video वर या सीरिजचे सर्व भाग पाहता येतील.
3) Pitchers
स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पिचर्स’ हा उत्तम पर्याय आहे. त्यातून स्टार्टअपसाठी काही मित्रांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून करिअरची मोठी जोखीम कशी पत्करली हे दाखवले आहे. स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठीची चार मित्रांची धडपड यात पाहायला मिळते. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून, ते ZEE-5 वरही तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही ही सीरिज अजून पाहिली नसेल, तर नक्की पाहा.
4) Special OPS :
ही एक थ्रिलर सीरिज असून, त्यात भारतीय गुप्तहेराची कथा पाहायला मिळते, जो अनेक वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधाराचा शोध घेतो. काम कितीही कठीण असलं तरी कामाबद्दलची आवड सामान्य जीवनातही कशी उपयोगी पडते हे यातून शिकण्यासारखं आहे. या सीरिजच्या प्रत्येक भागात नवीन वळण आणि रहस्य उलगडत जाते. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते. Hotstar वर ही सीरिज पाहायला मिळेल.
