जर तुम्हाला सिनेमागृहात जाण्याऐवजी घरबसल्या ओटीटीवर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहायला आवडत असेल, तर सप्टेंबरची सुरुवात तुमच्यासाठी खास असणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार आणि झी ५ यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार यापैकी काय पाहायचं, हे ठरवणं नक्कीच रंजक ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होणार आहे.
बिग बॉस सीझन २०
तुमच्याकडे जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन असेल, तर सप्टेंबरची सुरुवात तुमच्यासाठी धमाकेदार ठरणार आहे. कारण ६ सप्टेंबरला सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’च्या २०व्या सीझनची सुरुवात होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आणि छोट्या पडद्यावरील हा लोकप्रिय रिअॅलिटी शो यावेळी प्रेक्षकांसाठी काय खास घेऊन येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
‘गांधारी’
‘गांधारी’च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात एका आईची गोष्ट पाहायला मिळणार आहे, जी आपल्या मुलीच्या शोधासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. तापसी पन्नू या चित्रपटात बानीची भूमिका साकारत असून, तिच्या अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी ती धडपडताना दिसणार आहे.हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रिलीजपूर्वीच ‘गांधारी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लेखक कल्याण बांदी यांनी चित्रपटाची कथा २०१९ मध्ये लिहिलेल्या आणि नोंदणीकृत केलेल्या कथेसारखाच असल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि नेटफ्लिक्सने हे आरोप फेटाळून लावले.
‘द जेंटलमैन’ सीझन २
जर तुम्हाला भावनिक कथांपेक्षा क्राइम आणि अॅक्शनवर आधारित कंटेंट पाहायला आवडत असेल, तर ‘द जेंटलमॅन’ ही क्राइम ड्रामा वेब सीरिज तुमच्यासाठी चांगली निवड ठरू शकते. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता आणि आता चाहत्यांना दुसऱ्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा आहे. ‘द जेंटलमॅन’चा दुसरा सीझन ३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.दुसऱ्या सीझनमध्ये एडी आणि सुसी आपल्या गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. मात्र, बॉबीच्या काही निर्णयांमुळे त्यांच्यासमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत.
‘घमासान’
पॉलिटिक्स, ड्रामा, अॅक्शन आणि डिप्लोमसीने भरलेला ‘घमासान’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५वर प्रदर्शित होणार आहे. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात अरशद वारसी, प्रतीक गांधी आणि इशिता दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्तासंघर्ष, राजकारण, निष्ठा आणि अस्तित्वाची लढाई याभोवती चित्रपटाची कथा फिरते.’घमासान’चा प्रीमियर ११ सप्टेंबरला झी ५वर होणार आहे. सोशल मीडियावरील चर्चांमध्ये तो याआधीच प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी सध्या अधिकृत रिलीज डेट ११ सप्टेंबर हीच आहे.
‘धमाल ४’
सोशल मीडियावरील चर्चांनुसार,’धमाल ४’ सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांचा ‘धमाल ४’ ४ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकतो.मात्र, ४ सप्टेंबरची तारीख अद्याप निर्माते किंवा नेटफ्लिक्सकडून अधिकृत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती सध्या संभाव्य रिलीज डेट म्हणूनच पाहावी.
