Ott Release This Weekend: ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय खास असणार आहे. ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय खास असणार आहे. १५ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि झी५ वर अनेक नवीन आणि बिग बजेट प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात कॉमेडी, क्राईम, ॲक्शन आणि थ्रिलर अशा सर्वच जॉनरचा समावेश आहे.

या वीकेंडला प्रेक्षकांना कॉमेडी, क्राईम, ॲक्शन आणि थ्रिलर अशा सर्व प्रकारच्या कलाकृतींची मेजवानी मिळणार आहे. यामध्ये विजय वर्माची बहुप्रतिक्षित सीरिज ‘मटका किंग’, राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा चित्रपट ‘टोस्टर’ आणि पवन कल्याण यांचा ‘उस्ताद भगत सिंह’ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

टोस्टर

Toaster on OTT: या यादीतील पहिले नाव म्हणजे राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असलेला ‘टोस्टर’ हा चित्रपट. हा एक कॉमेडी चित्रपट असून यात राजकुमार राव ‘रमाकांत’ नावाच्या अतिशय कंजूस व्यक्तीची भूमिका साकारत आहे. रमाकांत आणि त्याची पत्नी एका लग्नात एक महागडा टोस्टर भेट म्हणून देतात, पण ते लग्न मोडतं. आता रमाकांतला तो टोस्टर परत हवा असतो आणि संपूर्ण गोष्ट याच गमतीशीर विषयाभोवती फिरते. हा चित्रपट आज १५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

उस्ताद भगत सिंग

Ustaad Bhagat Singh on OTT : पॉवर स्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी मार्चमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. ही गोष्ट एका लहान मुलाची आहे, ज्याला त्याच्या शिक्षकांनी ‘भगत सिंग’ हे नाव दिलं होतं. मोठा झाल्यावर तो एक प्रामाणिक पोलीस अधिकारी बनतो आणि अन्यायाविरुद्ध आपल्याच जुन्या गुरूंच्या विरोधात उभा ठाकतो. हा जबरदस्त ॲक्शन चित्रपट आज १५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

अस्सी

Assi on OTT : तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला ‘अस्सी’ हा एक कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. तापसीने यात एका वकिलाची भूमिका साकारली आहे, जी एका शालेय शिक्षिकेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

मटका किंग

Matka King on Prime Video: अभिनेता विजय वर्माची मटका किंग ही नवीन वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सीरिजमध्ये १९६० च्या दशकातील मुंबई पाहायला मिळणार आहे. विजय वर्माने यात ‘बृज भट्टी’ नावाच्या एका चतुर कापूस व्यापाऱ्याची भूमिका केली आहे. यात गुलशन ग्रोव्हर, कृतिका कामरा आणि सई ताम्हणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

दो दीवाने सहर में

Do Deewane Seher Mein on Netflix: सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ही कथा शशांक व रोशनीची आहे. ज्यात दोघेही आपल्या न्यूनगंडासह आयुष्य जगत असतात. या दोघांची भेट आणि त्यातून फुलत जाणारे प्रेम यावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.