ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विविध कलाकृती ओटीटीवर रिलीज होत आहेत. मृणाल ठाकूर, हुमा कुरेशी ते पंकज त्रिपाठी अशा अनेक लोकप्रिय कलाकारांच्या कलाकृती या आठवड्यात घरबसल्या पाहायला मिळणार आहे. यात काही आंतरराष्ट्रीय चित्रपट, सीरिजचाही समावेश आहे. कोणत्या आहेत या नवीन कलाकृती जाणून घेऊयात..

पूजा मेरी जान – मृणाल ठाकूर आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पूजा मेरी जान’ हा सायकोलॉजिकल कोर्टरूम थ्रिलर आहे. मृणाल पूजाच्या भूमिकेत आहे. अनिकेत नावाचा तरुण तिचा सतत पाठलाग करतो, मात्र पूजा त्याच्यावर प्रेम करत नाही. अनिकेतच्या आत्महत्येनंतर पूजावरच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होतो. हुमा कुरेशी सना, पूजाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट २ ऑक्टोबरला झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

Ohh My Dog – पंकज त्रिपाठी आणि पवन मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला Ohh My Dog हा इन्व्हेस्टिगेटिव्ह कॉमेडी-ड्रामा आहे. कथेत एक मुलगा आपल्या बेपत्ता झालेल्या मोमो नावाच्या कुत्र्याचा शोध घेत असतो. त्याचवेळी बिहारमधील एका तरुण मजुराच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण समोर येतं. सुरुवातीला वेगवेगळी वाटणारी ही दोन्ही प्रकरणं पुढे एकमेकांशी जोडली जातात आणि त्यातून एक रंजक तपास उलगडत जातो.थिएटरनंतर आता १ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होत आहे.

लव्ह – ऐश्वर्या लक्ष्मी आणि अर्जुन दास यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमँटिक ड्रामा प्रेम आणि आकर्षण खरंच डेटाच्या आधारे शोधता येतं का? याभोवती फिरतो. ऐश्वर्या लक्ष्मी ताराची भूमिका साकारत आहे. ती फाउंड नावाच्या डेटिंग अ‍ॅपची संस्थापक आहे आणि योग्य जोडीदार निवडण्यासाठी डेटा महत्त्वाचा मानते. तर अर्जुन दासचा मॅथ्यू डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून प्रेमाला आकड्यांमध्ये मोजता येत नाही, असं मानतो. दोघेही ६० दिवसांचं चॅलेंज स्वीकारतात. मात्र, हा प्रयोग करताना त्यांनाच प्रेम आणि आकर्षणाबद्दल नव्याने विचार करावा लागतो. २ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होत आहे.

East of Eden – नेटफ्लिक्स १ ऑक्टोबर
जॉन स्टाइनबेक यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित East of Eden ही सीरिज आहे. फ्लॉरेन्स प्यू मुख्य भूमिकेत आहे. कॅलिफोर्नियातील दोन कुटुंबांची अनेक पिढ्यांमध्ये सुरू असलेली कथा यात पाहायला मिळते. प्रेम, मत्सर, कौटुंबिक संघर्ष आणि जुन्या जखमांचा पुढच्या पिढीवर होणारा परिणाम या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

‘मैं लडेगा’ – जिओ हॉटस्टार, ३० सप्टेंबर
आकाश प्रताप सिंह मुख्य भूमिकेत असलेला हा स्पोर्ट्स ड्रामा आहे. घरात वडिलांकडून होणाऱ्या हिंसाचाराला कंटाळून एक तरुण आर्मी हॉस्टेलमध्ये जातो. तिथे तो बॉक्सिंग शिकायला सुरुवात करतो. बॉक्सिंगमुळे त्याला आत्मविश्वास मिळतो आणि तो राष्ट्रीय चॅम्पियनशिपचं स्वप्न पाहू लागतो. मात्र, त्याचं ध्येय केवळ जिंकणं नसून आईचं रक्षण करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणं असतं.

बेथलेहेम फॅमिली युनिट – जिओ हॉटस्टार, २ ऑक्टोबरनिविन पॉली आणि ममिता बैजू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बेथलेहेम फॅमिली युनिट’ हा मल्याळम रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. कथेत एका जोडप्याच्या वयातील अंतरामुळे त्यांच्या नात्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू होते. नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू लागतात. त्यामुळे या प्रेमकथेत अनेक मजेशीर प्रसंग घडताना पाहायला मिळतात.

मेडुसा सीझन २ – नेटफ्लिक्स, ३० सप्टेंबर

‘मेडुसा’च्या दुसऱ्या सीझनमध्ये बार्बरा हिडाल्गो पुन्हा आपल्या कुटुंबाच्या साम्राज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. कुटुंबातील सत्तासंघर्ष आणखी वाढतो. त्यातच काही गुपितं आणि धक्कादायक माहिती लीक झाल्याने हिडाल्गो कुटुंब अडचणीत येतं. आता बार्बराला कुटुंबातीलच कोण तिच्याविरोधात कट रचत आहे, हे शोधावं लागणार आहे.