या आठवड्यात ओटीटीवर काहीतरी नवीन पाहायचं असेल तर ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान नेटफ्लिक्स,प्राइम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार यांसह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. त्यामुळे तुमचा संपूर्ण आठवडा मनोरंजनाने भरलेला असेल. चला तर मग, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची संपूर्ण यादी जाणून घेऊया.

‘रिपोर्टिंग लाइव’ – हा इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात परिणीती चोप्रा एका तरुण पत्रकाराच्या, तर देवेन भोजानी त्यांच्या अनुभवी कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. हे दोघे मिळून एका शक्तिशाली सिंडिकेटकडून चालवल्या जाणाऱ्या धोकादायक आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या रॅकेटचा पर्दाफाश करतात. हा चित्रपट ९ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करता येणार आहे.

‘पती, पत्नी और पंगा’ (सीझन २) -हा सेलिब्रिटी जोडप्यांचा रिअॅलिटी गेम शो आहे. यात जोडप्यांना मजेदार आव्हाने आणि टास्क दिले जातात. तसेच, त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करून त्यांच्यातील केमिस्ट्री, एकमेकांमधील समन्वय आणि खऱ्या आयुष्यातील समजूतदारपणाची परीक्षा घेतली जाते. हा शो १० ऑक्टोबरपासून जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.

‘ॲनिमल्स’- बेन ॲफ्लेक एका क्राइम थ्रिलर चित्रपटात लॉस एंजेलिसच्या महापौरपदाच्या उमेदवार मार्क किम्बालची भूमिका साकारताना दिसणार आहे. तो त्याची पत्नी ॲबिगेल (केरी वॉशिंग्टन) हिच्यासोबत सुखी आयुष्य जगत असतो. मात्र, खंडणीसाठी त्यांच्या लहान मुलाचं अचानक अपहरण केलं जातं आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. हा चित्रपट ९ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

‘इनसाइड द सर्कल’ – ही एक मेक्सिकन थ्रिलर सीरिज आहे. बालपणीचे चार मित्र हे या सीरिजच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. एक व्हिडीओ लीक झाल्यानंतर आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येनंतर त्यांना ब्लॅकमेलिंग आणि सस्पेन्सचा सामना करावा लागतो. या घटनेमुळे अनेक धक्कादायक रहस्यं आणि कटकारस्थानं समोर येतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.ही सीरिज ७ ऑक्टोबर २०२६ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

‘बिलो’ – ही ६ भागांची कॅनेडियन हॉरर ड्रामा सीरिज आहे. ही कथा केल्विन पेनी (जोश हार्टनेट) याच्याभोवती फिरते. केल्विन हा स्थानिक मच्छीमार असून तो वडिलांच्या रहस्यमय मृत्यूमुळे त्रस्त आहे. आपल्या कुटुंबाचं, समुदायाचं आणि जीवनशैलीचं रक्षण करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो.ही सीरिज ८ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

‘मंदाडी’ – हा तमिळ स्पोर्ट्स-अ‍ॅक्शन ड्रामा तामिळनाडूच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतातील पारंपरिक आणि रोमांचक सेलबोट रेसिंग अर्थात पाल-नाव शर्यतीच्या स्पर्धेभोवती फिरते. चेन्नईहून परतलेला माजी रेसर मुथुकाली (सुरी) आणि त्याचा प्रतिस्पर्धी साट्टापुली (सुहास) यांच्यात पुन्हा ही रेसिंगची चुरस सुरू होते. हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करता येणार आहे.

‘१०० डेज ऑफ डिसेप्शन’ – ही दक्षिण कोरियाची हिस्टॉरिकल स्पाय-रोमांस सीरिज आहे. १९३२ मध्ये जपानी राजवटीदरम्यान ग्योंगसोंगमध्ये या सीरिजची कथा घडते. ली गा-क्योंग नावाची पाकीटमार तरुणी १०० दिवसांच्या गुप्तहेर मोहिमेसाठी जपानी गव्हर्नर-जनरलच्या कार्यालयात इंटरप्रिटर म्हणून अंडरकव्हर काम करते. तिथे तिची भेट किम ताए-वोंग नावाच्या एका अनुभवी इंटरप्रिटरशी होते. ही सीरिज १० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करता येणार आहे.