OTT Releases in October : दर आठवड्याला ओटीटीवर जबरदस्त सिनेमा व वेब सीरिज रिलीज होत असतात. घरबसल्या थ्रिलर व मनोरंजन करणारा सिनेमा पाहण्याचे अनेकांचे नियोजन असते, पण कोणता सिनेमा नक्की पाहावा असा प्रश्न पडला असला तर खाली दिलेले ८ सिनेमे नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवेत. १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ओटीटीवर सायकोलॉजिकल थ्रिलर, रोमँटिक ड्रामा, कॉमेडी आणि सायन्स फिक्शअशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथांचा समावेश असलेले सिनेमे विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. काही दाक्षिणात्य चित्रपट हिंदी डबिंगमध्येही पाहता येणार आहेत.
१. कप्पी स्क्वॉड
मल्याळम भाषेतील ‘कप्पी स्क्वॉड’ ही कॉमेडी सीरिज १५ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे हिंदी डबिंगसुद्धा प्रदर्शित होणार आहे. रिनोश जॉर्ज मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजमध्ये चार मित्र मिळून लोकल कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतात. मात्र, व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना आर्थिक अडचणी, पैशांची कमतरता, त्यासाठी आलेली आव्हाने आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये बदल होऊ लागल्याने व्यवसायाचा परिणाम नात्यांवर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मैत्रीवर आधारित कथा असलेला कप्पी स्क्वॉड मनोरंजक सिनेमा असणार आहे.
२. आशा
मल्याळम भाषेतील ‘आशा’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट १६ ऑक्टोबरला हिंदी डबिंगमध्ये प्रदर्शित होणार आहे. उर्वशी, जोजू जॉर्ज आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कुटुंबातील एक दडलेलं गुपित अचानक समोर येते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य एकमेकांवर संशय घेऊ लागतात. स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी जवळची माणसेसुद्धा किती टोकाला जाऊ शकतात, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट झी ५ वर पाहता येईल.
३. डिस्क्लोजर डे
हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा ‘डिस्क्लोजर डे’ हा सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट १२ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. एमिली ब्लंट आणि जोश ओ’कॉनर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पृथ्वीवर एलियन्सचं अस्तित्व असल्याची माहिती लपवणाऱ्या गुप्त सरकारी मोहिमेचा उलगडा होतो. सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शक्तिशाली अधिकाऱ्यांचा सामना करावा लागतो. कॉलिन फर्थ, ईव्ह ह्यूसन आणि कोलमन डोमिंगो यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत.
४. लव्ह ऑफ युअर लाइफ
‘लव्ह ऑफ युअर लाइफ’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट १३ ऑक्टोबरला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. मार्गारेट क्वॉलीने माया, तर गॅब्रिएल बासोने चार्लीची भूमिका साकारली आहे. चार्लीशी अचानक झालेल्या भेटीनंतर मायाच्या आयुष्यात अनेक बदल घडू लागतात. प्रेम, नातेसंबंध आणि स्वतःचं भविष्य घडवताना कराव्या लागणाऱ्या कठीण निर्णयांवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रॅचेल मॉरिसन यांनी केलं आहे.
५. द ट्रॅप
जर्मन भाषेतील ‘द ट्रॅप’ ही सहा भागांची सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज १३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. फ्रीडेरिक बेचने एका लोकप्रिय लेखिकेची भूमिका साकारली आहे. बहिणीच्या निर्घृण हत्येनंतर जवळपास दहा वर्षे घराबाहेर न पडलेली ही लेखिका एके दिवशी टीव्हीवर मारेकऱ्याला पाहते. त्यानंतर ती स्वतः पुढाकार घेत त्याला पकडण्याचा आणि शिक्षा करण्याचा निर्णय घेते. मेलानी राबे यांच्या कादंबरीवर आधारित या सीरिजमध्ये खुनाचा बदला आणि संघर्षाची कथा पाहायला मिळते.
६. व्हिजनक्वेस्ट
मार्व्हल स्टुडिओजची ‘व्हिजनक्वेस्ट’ ही सायन्स फिक्शन सीरिज १४ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पॉल बेटनी पुन्हा एकदा व्हाइट व्हिजनच्या भूमिकेत दिसणार असून, आठवणी गमावल्यानंतर तो स्वतःची ओळख आणि आयुष्याचं ध्येय शोधण्याचा प्रयत्न करतो. जेम्स स्पेडर अल्ट्रॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वांडाव्हिजन’ आणि ‘अगाथा ऑल अलाँग’ या सीरिजनंतरची ही कथा असून, मार्व्हलच्या चाहत्यांसाठी ती खास आकर्षण ठरणार आहे.
७. मास्टरप्लान
‘मास्टरप्लान’ हा चोरीवर आधारित चित्रपट १६ ऑक्टोबरला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. थॉमस व्हिन्सेंट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात स्टॅन्ली टुची, सिमोना टाबास्को आणि व्हिक्टर बेलमोंडो यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांपासून दूर गेलेलं कुटुंब एका मोठ्या चोरीसाठी पुन्हा एकत्र येतं. मात्र, प्रत्येकाच्या मतांमधील फरक आणि मतभेद यामुळे ही चोरी खूपच गुंतागुंतीची बनते.
८. मनीट्रॅप : द कारुन ट्रेझर
‘मनीट्रॅप : द कारुन ट्रेझर’ ही तुर्की क्राइम-कॉमेडी सीरिज १६ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आठ भागांच्या या सीरिजमध्ये यिलमाझ एर्दोगन आसिम नोयन या चोराच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. एका जुन्या नकाशाच्या मदतीने त्याची टोळी शेवटची मोठी चोरी करण्याचा प्लॅन आखते. हा नकाशा त्यांना शापित कारुन खजिन्यापर्यंत घेऊन जातो. मात्र, या खजिन्यावर प्रतिस्पर्धी टोळ्यांचाही डोळा असतो. त्यात आंतरराष्ट्रीय खजिना शोधणारेही मागावर असल्याने हा खजिना मिळवण्याच्या मोहिमेत अनेक अडचणी येतात.
