Upcoming OTT Releases May 2026 : या आठवड्यात ओटीटीवर गुप्तहेर कथा, अंतराळातील थरार, गुन्हेगारी ड्रामा आणि भावनिक नात्यांच्या कथा अशा विविध प्रकारच्या वेब सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. १२ मे ते १५ मे २०२६ दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या या नव्या कंटेंटमधून डिजिटल मनोरंजनाचं वाढतं वैविध्य दिसून येत आहे.
एका बाजूला आदित्य धरचा ‘धुरंधर’ अधिक गडद आणि राजकीय संघर्षांनी भरलेल्या कथेसह प्रेक्षकांसमोर येत आहे, तर दुसऱ्या बाजूला रायन गोसलींग Ryan Gosling अभिनीत ‘Project Hail Mary’मध्ये अंतराळातील एकाकी प्रवास आणि जगण्यासाठीची धडपड पाहायला मिळणार आहे. थरार, महत्त्वाकांक्षा आणि भावनिक संघर्षांनी भरलेल्या अनेक दमदार कलाकृती या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत. जाणून घेऊयात या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय पाहता येणार आहे.
या आठवड्यात पाहता येणार ‘या’ सीरिज व चित्रपट
धुरंधर २ – या आठवड्यातील बहुसर्वात चर्चित रिलीजपैकी एक म्हणजे ‘धुरंधर २’ आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय थ्रिलर अधिक मोठ्या प्रमाणावर आणि थरारक कथेसह प्रेक्षकांसमोर येत आहे. रणवीर सिंह पुन्हा एकदा हमजा अली मझारीच्या भूमिकेत दिसणार असून, सूड आणि राजकीय कटकारस्थांनी भरलेली ही कथा कराची, बलुचिस्तान, दुबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचते. चित्रपटात संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. १५ मे रोजी जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
Project Hail Mary – हा Andy Weir यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ड्रामा आहे. या चित्रपटात Ryan Gosling रायलंड ग्रेस नावाच्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसतो, जो एका अंतराळयानात जागा होतो आणि त्याला स्वतःची ओळखही आठवत नसते. हळूहळू त्याला समजतं की, सूर्याशी संबंधित मोठ्या संकटापासून मानवजातीला वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. अंतराळातील एकटेपणा, जगण्यासाठीची धडपड आणि भावनिक संघर्ष यांची प्रभावी मांडणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १२ मे पासून प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे.
कर्तव्य – सेफ अली खान अभिनीत ‘कर्तव्य’ ही भ्रष्ट व्यवस्था आणि वैयक्तिक संघर्षावर आधारित दमदार अॅक्शन थ्रिलर आहे. सेफ या सीरिजमध्ये झामली पोलीस ठाण्याचा SHO पवन मलिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. वाढता हिंसाचार, राजकीय दबाव, गुन्हेगारीचं जाळं आणि बिघडत चाललेलं वैयक्तिक आयुष्य यामध्ये अडकलेल्या एका अधिकाऱ्याची ही कथा आहे. नैतिक संघर्ष आणि जगण्यासाठीची धडपड यामुळे ही मालिका अधिक रंजक बनली आहे. १५ मे पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.
Inspector Avinash Season 2 – रणदीप हुडा पुन्हा एकदा इन्स्पेक्टर अविनाशच्या दुसऱ्या सीझनमध्ये यूपीचे धडाकेबाज पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेळी अविनाशचा सामना शेख नावाच्या गँगस्टरच्या बेकायदेशीर शस्त्र तस्करीच्या मोठ्या जाळ्याशी होतो. अॅक्शन, राजकीय दबाव आणि वैयक्तिक संघर्षांनी भरलेला हा नवा सीझन अधिक थरारक असणार आहे. १५ मे पासून जिओ हॉटस्टारवर ही सीरिज पाहता येणार आहे.
Exam – ही भारतातील स्पर्धा परीक्षा घोटाळ्यांवर आधारित थरारक सीरिज आहे. थायकारा या काल्पनिक डोंगराळ शहरात घडणाऱ्या या कथेत RPSE परीक्षेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघड केले जातात. झांसी नावाची तरुणी पोलीस अधिकाऱ्याची ओळख घेऊन या घोटाळ्याच्या जाळ्यात शिरते. तपास, कटकारस्थान आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार यामुळे ही सीरिज अधिक रंजक बनते. १५ मे पासून प्राईम व्हिडीओवर ही सीरिज पाहता येईल.
Off-Campus Season 1 – Off-Campus ही Elle Kennedy यांच्या लोकप्रिय कॉलेज रोमँस कादंबऱ्यांवर आधारित सीरिज आहे. या कथेत म्युझिक शिकणारी हॅना वेल्स आणि हॉकी स्टार गॅरेट ग्रॅहम खोट्या नात्याचं नाटक करताना हळूहळू एकमेकांच्या जवळ येतात. कॉलेजमधील मजा, प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यांमधील गुंतागुंत यामुळे ही सीरिज खास ठरणार आहे.
