सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर ९ नवीन चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘गांधारी’ हा महत्त्वाचा चित्रपट आहे. त्याचबरोबर अजय देवगणचा ‘धमाल ४’ आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ४ नवे प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही वेब सीरिजचे सीझनही नेटफ्लिक्स व इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहेत. वाचा संपूर्ण यादी…
१. गांधारी (Gandhari)
देवाशीष मखीजा दिग्दर्शित या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात बानी (तापसी पन्नू) ही एका रेल्वे स्टेशनवर हरवलेल्या आपल्या लहान मुलीचा शोध घेत असते. एका जीवघेण्या हल्ल्यात ती आपली दृष्टी गमावते. अंध झाल्यानंतरही ती एका रहस्यमयी शहरात बालतस्करांच्या टोळीशी लढा देते. हा चित्रपट तुम्ही आज ३ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
२. धमाल ४ (Dhamaal 4)
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझीचा हा चौथा भाग आहे. गुंडू, लल्लन, आदी आणि मानवाची जुनी टोळी पुन्हा एकदा खजिन्याच्या शोधात एका रहस्यमयी बेटावर पोहोचते. अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि रवी किशन यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ४ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
३. जीडीएन (GDN)
‘भारताचे एडिसन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय संशोधक आणि उद्योगपती गोपाळस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. आर. माधवनने यात मुख्य भूमिका साकारली असून त्यांच्यासोबत प्रियामणी आणि सत्यराज आहेत. हा चित्रपट तुम्ही ४ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
४. द कोर्ट (The Court)
ही एक तमिळ कोर्टरूम ड्रामा सीरिज आहे. यामध्ये याझिनी या तोतरे बोलणाऱ्या एका तरुण वकिलाची कथा आहे, जी कोर्टात एका कठीण केसदरम्यान स्वतःच्याच प्रसिद्ध वकील असलेल्या वडिलांच्या विरोधात लढते. द कोर्ट तुम्ही ४ सप्टेंबरपासून जिओहॉटस्टारवर पाहू शकता.
५. उन्मदम (Unmadham)
किरण दास दिग्दर्शित हा मल्याळम सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. शेली हा एक पोलीस कर्मचारी असून त्याला स्क्रीनरायटर बनायचे असते. बदलीच्या आशेने तो एक जुनी केस उघडतो, पण तपासादरम्यान त्याच्यासमोर काही विचित्र घटना घडतात. या चित्रपटात कुंचाको बोबन, विशाक नायर, कृष्णा प्रभा आणि लिजोमोल जोस मुख्य भूमिकेत आहेत. उन्मदम हा चित्रपट तुम्ही ४ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर पाहू शकता.
६. कोरियन कनकराजू (Korean Kanakaraju)
वरुण तेजची मुख्य भूमिका असलेला हा एक तेलूगु हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. चुकून आलेल्या एका कोरियन पार्सलमधील फूलदाणीत एका कोरियन गँगस्टरची राख असते. कनकराजू त्यात दारू टाकून पितो, ज्यामुळे त्याच्यात विचित्र शक्ती येतात आणि तो गँगस्टरची आत्मा त्याला दक्षिण कोरियाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, असा हा चित्रपट आहे. कोरियन कनकराजू तुम्ही ४ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
७. लव्हसिक (Lovesick)
१९१० च्या मेक्सिकन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित ही ७ एपिसोडची मेक्सिकन पीरियड ड्रामा सीरिज आहे. यामध्ये एका श्रीमंत घरातील मुलगी आणि विरोधी विचारसरणीच्या मुलाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ही सीरिज २ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.
८. द जेंटलमन सीझन २ (The Gentlemen Season 2)
पहिल्या सीझननंतर आता एडी हॉर्नमॅन आपला गांजाचा बेकायदेशीर व्यवसाय इटलीपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे त्याला आणि सूसी ग्लास यांना इटलीतील खतरनाक गुन्हेगारी टोळ्यांचा सामना करावा लागतो. यात थिओ जेम्स आणि काया स्कोडेलेरियो मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज तुम्ही आज, ३ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
९. मेडे (Mayday)
रयान रेनॉल्ड्सची मुख्य भूमिका असलेला हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. यात युएस नेव्ही पायलट ट्रॉयचे कोल्ड वॉरदरम्यानचे एक गुप्त मिशन फसते आणि तो शत्रूच्या भागात अडकतो. तिथे त्याला एका माजी केजीबी एजंटची मदत मिळते. मेडे तुम्ही ४ सप्टेंबरपासून अॅपल टीव्हीवर पाहू शकता.
