OTT Releases This Week: दर आठवड्याला ओटीटीवर काही न काही नवीन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतं. त्यात प्रादेशिक कलाकृतींचा ओटीटीवर नेहमीच बोलबाला असल्याचं दिसतं. मातीशी जोडलेल्या कथा, गोष्टी, वेगळं कथानक यांमुळे प्रेक्षक या कलाकृतींना पसंती देताना दिसतात. त्यात याला जर थ्रिलर, सस्पेन्सची जोड असेल, तर हे चित्रपट व सीरिज मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ओटीटीवर दाक्षिणात्यसह इतर काही प्रादेशिक भाषांतील कलाकृती दाखल झाल्या आहेत. सायकॉलॉजिकल थ्रिलर, ग्रामीण बाज असलेल्या कथा, हॉरर अशा धाटणीच्या कलाकृती प्रेक्षकांना महिन्याच्या पहिल्याच आठवड्याला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात कोणते सीरिज-चित्रपट रीलिज होणार आहेत ते जाणून घेऊयात…

या आठवड्याला ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट

Dheeran – हा एक मल्याळम क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. त्यात इंद्रजित सुकुमारन यानं एसीपी स्टालिन जोसेफ ही भूमिका साकारली आहे. ते एन्काउंटर स्पेशलिस्ट असून, कोझिकोडमधील एका नाईट क्लबच्या पार्किंगमध्ये सापडलेल्या निर्घृण खुनाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. सुरुवातीला हा गुन्हा वेगळा वाटतो; मात्र तपास पुढे सरकत असताना शहरातील अनेक बळींना जोडणारा एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा पॅटर्न उघड होत जातो.

Devagudi – हा एक तेलुगू चित्रपट आहे. हा चित्रपट जातीय तणाव आणि पिढ्यान्‌ पिढ्यांच्या संघर्षावर भाष्य करतो. धर्मा हा एका विश्वासू ड्रायव्हरचा मुलगा असून, तो प्रभावशाली वीरा रेड्डी यांच्या मुलांसोबत लहानाचा मोठा होतो. पुढे धर्मा वीरा रेड्डींची मुलगी श्वेताच्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याला गावाबाहेर हाकलून दिलं जातं. त्यानंतर राजकीय स्पर्धा, बेपत्ता होण्याच्या घटना व सूडभावना अशा घटना घडू लागतात.

ग्रॅनी – हा एक सायकॉलॉजिकल हॉरर तमीळ चित्रपट आहे. ६ मार्च रोजी सन एनएक्सटीवर तो प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओच्चाई या एका वृद्ध स्त्रीभोवती फिरतो. एका बालहत्येच्या तपासासाठी पोलिस अधिकारी चौकशी करत असताना, लंडनमध्ये स्थायिक असलेले एक तरुण दाम्पत्य त्यांच्या मुलांसह त्यांच्या गावातील घरात राहायला येतात. ओच्चाईचा भूतकाळ त्या कुटुंबाला ठाऊक नसतो आणि नकळत ते आपल्या आयुष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देतात. पोलिस तपास आणि घरातील वाढत जाणारी दहशत यांमध्ये कथा सतत हेलकावे खाते. हा चित्रपट झपाटणे, गूढ विधी आणि पिढीजात शाप अशा घटकांवर आधारित आहे.

ओम शांती शांती शानतीही – हा तेलुगू चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जय जय जय या मूळ मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. पितृसत्ताक समाजावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये एका सुशिक्षित मुलीला शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या एका मुलाबरोबर लग्नासाठी आग्रह केला जातो, असं पाहायला मिळतं. परंतु, जिच्याबरोबर हे सर्व घडत असतं ती प्रशांती हे फक्त सहन न करता प्रत्युत्तर देते आणि घरगुती हिंसाचार करणाऱ्याला अद्दल शिकवते. या चित्रपटाला विनोदाचीही किनार आहे.

डियर राधी – ६ मार्चला सन एनएक्सटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर तमीळ चित्रपट आहे. त्याला सस्पेन्सची जोड आहे. आयटीमध्ये काम करणाऱ्या मुलींची भीती वाटणाऱ्या मदन नावाच्या मुलाची राधी या स्पा वर्करबरोबर भेट होते. त्यानंतर तिच्याशी बोलल्यानंतर त्याच्या मनातील संकोच दूर होतो. शहरातील वेगवेगळ्या जागांमधून सुरू झालेला शांत आणि अंतर्मुख प्रवास अचानक तणावपूर्ण वळण घेतो, जेव्हा राधी आणि तिचा सहकारी वरदान हे कायदेशीर अडचणींपासून पळ काढत असल्याचं उघड होतं. गुपितं एकामागोमाग एक समोर येऊ लागतात आणि कथानक महत्त्वाच्या वळणावर पोहोचतं, जिथे पात्रांमधील लपलेले संबंध उलगडतात. डियर राधी हा चित्रपट एकटेपणा, विश्वास आणि धोका यांच्यामधील नाजूक सीमारेषा यांवर भाष्य करतो.

विक्रम ऑन ड्युटी – ही एक क्राइम थ्रिलर तेलुगू सीरिज आहे, जी ६ मार्चला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. निखिल मलियक्कलने यामध्ये विक्रम वसू या पोलिस अधिकाऱ्याचं पात्र साकारलं आहे. विक्रम त्याच्या स्वभावामुळे अनेकदा अडचणीत अडकतो. विक्रम गुंतागुंतीच्या गुन्हेगारी कटांमधून मार्ग काढत असताना, त्याच्या स्वतःच्या भूतकाळातील एक भयावह रहस्य पुन्हा समोर येतं. त्यामुळे कथेचं नवीन वळण येतं. या सीरिजमध्ये डार्क कॉमेडी आणि रहस्य पाहायला मिळतं. ही कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे.

13tenn – हा पंजाबी चित्रपट गुरुवार, ५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील किशोरवयीन आयुष्यावर प्रकाश टाकतो. ही कथा काही किशोरवयीन मुला-मुलींच्या आयुष्याभोवती फिरते, जे स्वतःची ओळख, मित्रांचा दबाव आणि बदलत जाणारी नाती यांच्याशी झुंज देत आहेत.