OTT Releases This Week: एप्रिल महिन्याची सुरुवात ओटीटी प्रेमींसाठी अत्यंत खास ठरणार आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, आणि झी५ सारख्या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक सरस वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘हे काय नवीन?’ या मराठी कौटुंबिक ड्रामा सीरिजची. १० वर्षांच्या सुखी संसारानंतर करिअरसाठी लागलेली ओढ आणि नात्यातील चढ-उतार याचे उत्तम चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. यासोबतच ‘XO, Kitty’ चा तिसरा सीझन आणि मोना सिंगची प्रमुख भूमिका असलेली ‘Maa Ka Sum’ यांसारख्या १० प्रमुख सीरिज या वीकेंडला तुमचे मनोरंजन करणार आहेत.
हे काय नवीन?
प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेली ही मराठी कौटुंबिक ड्रामा सीरिज आहे. १० वर्षांच्या सुखी संसारानंतर, रमा (प्रिया) स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी फॅशनच्या जगात पाऊल ठेवते, ज्यामुळे तिच्या नात्यात नवीन वळणं येतात. जोडीदाराच्या अपेक्षा आणि करिअर यामुळे त्यांच्या नात्यात येणारे चढ-उतार यात पाहायला मिळतात. ही सीरिज आज ३१ मार्च रोजी झी5 वर रिलीज झाली आहे.
इट प्रे बार्क (Eat Pray Bark)
ही एक जर्मन कॉमेडी सीरिज आहे. आल्प्स पर्वतांच्या रांगांमध्ये पाच विक्षिप्त कुत्रे आणि त्यांच्या मालकांसाठी आयोजित केलेल्या एका प्रशिक्षण शिबिराची ही मजेशीर गोष्ट आहे.ही सीरिज १ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
एजंट फ्रॉम अबव्ह (Agent From Above)
तैवानची ही फँटसी सीरिज सात वर्षांच्या मेहनतीनंतर प्रदर्शित होत आहे. बालपणीच्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी एक तरुण दुष्ट शक्तींशी लढा देतो, अशी या सीरिजची गोष्ट आहे. ही तुम्ही २ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकाल.
सिन्स ऑफ कुजो (Sins of Kujo)
ही जपानी सीरिज आहे. ताइझा कुजो हा एक असा वकील आहे जो गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कायद्याचा वापर करतो. ताइझा कुजो (युया यागिरा) स्वतःला एक चांगला वकील मानतो, पण तो दोषींना वाचवत असतो. मग ते याकुझाचे सदस्य असोत किंवा सराईत गुन्हेगार, कुजो त्यांची शिक्षा कमी करण्यासाठी कायद्याचा तलवारीसारखा वापर करतो. शोहेई मनाबे यांच्या गाजलेल्या मांगावर आधारित ही दहा भागांची सीरिज आहे. ही २ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
XO, Kitty – सीझन ३
या प्रसिद्ध सीरिजच्या शेवटच्या भागात किटी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सियोलला परतते. यावेळी लारा जीनची भूमिका करणारी लॅना कॉन्डोर सुद्धा पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहे. ही सीरिज २ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
भाभीजी घर पर है: फन ऑन द रन
तुमचे लाडके शेजारी आता मॉडर्न कॉलनी सोडून उत्तराखंडच्या सहलीवर निघाले आहेत. अंगूरी भाभी आणि विभूती नारायण मिश्रा यांचा हा प्रवास गुन्हेगारांमुळे कसा गोंधळतो ही गंमत यात पाहायला मिळेल. ही सीरिज ३ एप्रिलला झी5 वर रिलीज होईल.
ब्लडहाउंड्स – सीझन २
दोन बॉक्सर मित्रांची ही जोडी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंडरग्राउंड बॉक्सिंग आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसेल. तुम्ही पहिला सीझन पाहिला असेल व दुसऱ्या सीझनची वाट पाहत असाल तर तुम्हाला तो ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
गँग्स ऑफ गॅलिसिया – सीझन २
ही स्पॅनिश क्राईम सीरिज असून यात ड्रग व्यापार आणि दोन टोळ्यांमधील युद्धाची थरारक कथा पुढे नेण्यात आली आहे. ही सीरिज तुम्ही ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
हाय टाइड्स – सीझन ३
बेल्जियमच्या या थ्रिलर सीरिजचा हा शेवटचा सीझन आहे, जिथे अनेक जुन्या रहस्यांचा उलगडा होणार आहे. तुम्ही या सीरिजचे चाहते असाल तर ३ एप्रिलला नेटफ्लिक्सवर त्याचा शेवटचा सीझन पाहायला विसरू नका.
Maa Ka Sum
गणिताची आवड असलेल्या अगस्त्यला वाटतं की प्रत्येक मानवी समस्या एका अल्गोरिदमने सोडवता येते, अगदी त्याच्या अविवाहित आईची लव्ह लाइफसुद्धा. यामध्ये अगस्त्यच्या भूमिकेत मिहिर आहुजा आहे. जो त्याची आई विनिता (मोना सिंह) हिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याकरिता ‘प्रोजेक्ट मॉम’ सुरू करतो. यात अंगिरा धर आणि रणवीर ब्रार यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज तुम्हाला ३ एप्रिलपासून प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
