Best Bollywood movies based on politics : राजकारण हा विषय नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा राहिला आहे. सत्ता, संघर्ष, डावपेच, नेतृत्व आणि सतात घडणाऱ्या घडामोडी यांमुळे हा विषय प्रेक्षकांनाही आकर्षित करतो. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतही राजकारणावर आधारित अनेक दमदार चित्रपट बनले आहेत. सत्तेच्या खेळापासून निवडणुकीतील रणनीतीपर्यंत विविध पैलू उलगडणाऱ्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांविषयी जाणून घेऊयात…
भारतातील राजकारणावर आधारित चित्रपटांची चर्चा झाली आणि ‘नायक’चा उल्लेख झाला नाही, असं होऊच शकत नाही. अनिल कपूर अभिनित हा चित्रपट एका सामान्य माणसाची कथा दाखवतो, जो एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो. चित्रपटात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लिव्हर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
मणी रत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘युवा’ चित्रपटात अजय देवगण, अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी, करीना कपूर आणि ईशा देओल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात विद्यार्थी राजकारण, भ्रष्टाचार आणि तरुणांची ताकद पाहायला मिळते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
‘सरकार राज’ हा राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला राजकीय चित्रपट असून ‘सरकार’चा सिक्वेल आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनित या चित्रपटात महाराष्ट्रातील सत्ता, राजकारण आणि कौटुंबिक संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
‘राजनीती’ हा प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे, जो ‘महाभारत’ पासून प्रेरित आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, कतरिना कैफ, अजय देवगण, मनोज बाजपेयी आणि नाना पाटेकर यांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपटात सत्तेचं राजकारण, डावपेच आणि लालसा प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
‘मद्रास कॅफे’ हा जॉन अब्राहम अभिनित चित्रपट श्रीलंकेतील गृहयुद्ध आणि एका मोठ्या राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात गुप्तहेरगिरी आणि राजकारण यांचा संगम पाहायला मिळतो. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
‘सत्याग्रह’ हा प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट आहे. देशातील भ्रष्टाचाराविरोधात उठवलेला आवाज आणि जनआंदोलन या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. यात अमिताभ बच्चन, अजय देवगण, करीना कपूर आणि मनोज बाजपेयी यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
‘न्यूटन’ हा एक उत्कृष्ट हिंदी राजकारणावर आधारित डार्क कॉमेडी चित्रपट आहे. राजकुमार राव यात प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसतो. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
