Panchayat 4 actor Vinod Suryavanshi on Casteism : ‘पंचायत’ सीझन ४ मध्ये अभिनेता विनोद सूर्यवंशी याने एक छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. विनोदने नुकताच त्याला आलेला जातीयवादाचा अनुभव सांगितला. कर्नाटकातील त्याच्या गावात आजही त्याच्या कुटुंबाला मंदिरात आणि इतरांच्या घरात प्रवेश दिला जात नाही, असा खुलासा त्याने केला. विनोद अभिनेता असला तरी, त्याच्या गावकऱ्यांसाठी तो आजही कनिष्ठ जातीचा आहे. गावात आजही दोन स्वतंत्र वस्त्या असून दलितांना मुख्य प्रवाहापासून वेगळं ठेवलं जात असल्याचं त्याने सांगितलं.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना विनोद म्हणाला, “कर्नाटकातील माझ्या गावात आजही जातीयवाद पाळला जातो. आमच्या गावात दोन भाग आहेत – एक उच्चवर्णीयांसाठी आणि दुसरा कनिष्ठ जातीच्या लोकांसाठी. दलितांची वस्ती गावापासून वेगळी आहे. मी १२ वर्षांचा असताना एकदा वडिलांबरोबर गावात गेलो होतो; तिथे एका हॉटेलमध्ये जेवल्यावर आम्हाला आमची ताटं स्वतःच धुवावी लागली होती आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागले होते. माझ्या गावात आजही असं एक मंदिर आहे जिथे आम्हाला प्रवेश नाही.”
विनोद सूर्यवंशीचे चित्रपट
विनोदने केवळ ‘पंचायत’मध्येच नाही, तर ‘जनावर’, ‘थम्मा’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘जॉली एलएलबी ३’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
केवळ विनोद सूर्यवंशीच नाही, तर देशातील जातीयवादावर आधारित ‘होमबाउंड’ सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनीही त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे.
जात लपवली, कारण भीती वाटायची- नीरज घायवान
‘द हिंदू’शी बोलताना ते म्हणालेले, “मला स्वतःला बळी म्हणून लोकांना दाखवायचें नाही, पण काही कारणांनी आम्ही आमची जातीय ओळख लपवून ठेवली, कारण आम्हाला समाजातून वाळीत टाकलं जाईल ही भीती होती. सुरुवातीला उच्चवर्णीय असल्याचं भासवून सगळं ठीक होईल असं मला वाटलं, पण माझ्या विवेकाला ते पटत नव्हतं. शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात जर कोणाला माझी खरी जात कळाली, तर मी तिथल्या बुद्धिजीवी लोकांचा भाग नसेल, अशी भीती मला वाटायची. ही भीती अनेक वर्षे माझ्या मनात होती. मात्र, कालांतराने मी यावर विचार केला आणि ठरवलं जातीची लाज वाटायला नको. जे लोक आम्हाला ओळख लपवायला भाग पाडतात, खरी लाज त्यांना वाटायला हवी. वयाच्या ३५ व्या वर्षी मी माझी खरी ओळख आणि माझे आडनाव स्वीकारण्याचा निर्णय घेतला.”
