प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या पंचायत वेबमालिकेचा चौथा सीझन प्रसिद्ध झाला. फुलेरा गावची ही चौथी सैरही लोकांना भावत आहे. तिसऱ्या सीझनच्या अखेरचा संघर्ष चौथ्या सीझनमध्येही कायम ठेवून त्यात निवडणुकीचा रंग चढवण्यात आला आहे. ‘पंचायत’चा हलकाफुलका स्वाद या हंगामातही कायम आहे.
नेटफ्लिक्सने २०१६ मध्ये भारतात एन्ट्री घेतली. पण नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या फोनवर येण्यासाठी २०१८ च्या सेक्रेड गेम्स वेब सिरीजने मोठा हातभार लावला. हळूहळू ओटीटीवरील सीरिज म्हणजे हिंसा, सेक्स, थरार हे समीकरण रुढ होत होतं. दोनच वर्षांत आलेल्या कोविडने लोकांना मुबलक वेळ मिळाला. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेकांच्या आवडत्या छंदात ओटीटीने स्थान मिळवले. त्याचवेळी टीव्हीएफ क्रिएशन्सची पंचायत ही सीरिज प्रदर्शित झाली.
३ एप्रिल २०२० रोजी अॅमेझॉन प्राइमवर पंचायतचा पहिला सीजन आला. हिंसा, सेक्स, थरार या ओटीटीवर हिट ठरणाऱ्या समीकरणाला या मालिकेत पुरता छेद देण्यात आला होता. ओटीटीवर कशा प्रकारच्या मालिका लोकांना पसंत पडू शकतात, याचे सगळे ठोकताळे ‘पंचायत’ ने फोल ठरवले. एक अत्यंत साधीसरळ, सोपी, शांत लयीतली कथा पंचायतच्या रुपाने आली आणि लोकांच्या गळ्यातली ताईत ठरली. एक, दोन नव्हे तिन्ही सीझनवर प्रेक्षकांनी भरूभरून प्रेम केलं आणि आता चौथ्या सीझनने देखील लोकांचा हा विश्वास सार्थ ठरवला.
या सीझनमध्ये फुलेरात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहताना दिसतात. विद्यमान सरपंच मंजू देवी (नीना गुप्ता) यांचं पद धोक्यात आहे. प्रधानजी (रघुवीर यादव), मंजू देवी आणि विरोधी गटातील बनराकस (दुर्गेश कुमार) आणि त्याची पत्नी आणि सरपंच पदाची दावेदार क्रांती देवी (सुनीता राजवार) यांच्यातील डावपेच कधी मनोरंजक तर कधी अती वाटतात. प्रधानजींवर मागील सीझनअखेर गोळी कोणी झाडली याचं उत्तर, सचिवजी (जितेंद्र कुमार)वर दाखल केस, त्याचा कॅट परीक्षेचा निकाल, सरपंच आणि विकासवर पडलेला एसीबीचा छापा अशा अनेक खुसखुशीत प्रसंगांनी हाही सीझन फुलला आहे.
बिनोदची न झालेली गद्दारी, राजकीय कुरघोड्यांनी गाठलेलं टोक अत्यंत शांतपणे राजकीय भाष्य करून जाते. काही उण्या बाजूही आहेत. सचिवजी आणि रिंकीचं मागील सीझनमध्ये फुललेलं प्रेम या हंगामात काहीसं मागे पडलं आहे. तीन सीझन पाहून प्रेक्षकांना ही मालिका इतकी कळू लागली आहे की त्या त्या भागात साधारण काय होणार याचा अंदाज घेता येतो. प्रधानजींवर झाडलेल्या गोळीचा मालक कळूनही ती कथा अर्धवट ठेवण्यात आली आहे. बाकी निवडणुकीने, त्यातल्या पक्षांच्या निशाण्या (दुधी आणि कुकर) यांनी विनोदाची पेरणी केली आहे. गावातलं शांततेत पार पडलेलं आणि विशेष म्हणजे बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानाचा निकाल पुढील सीझनचे वेध लावून गेला आहे.
टीव्हीएफच्या बहुतांश मालिकांचा स्वाद पंचायतसारखाच शांत, ठहराव असणारा आहे. भारतात ओटीटी हा प्रकार नवखा असताना टीव्हीएफने आणलेली परमनंट रुममेट ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ट्रिपलिंग, ये मेरी फॅमिली, गुल्लक, कोटा फॅक्टरी या सर्वच मालिका एकाहून एक सरस आहेत. ‘पंचायत’चे आणखी किती सीझन येणार माहीत नाही, पण ती मालिका संपूच नये अशी प्रेक्षकांची इच्छा निर्मात्यांनी ओळखलेली आहे, हे नक्की.
manisha.devne@expressindia.com