Trending crime Thriller Movie on OTT: तुम्हाला ओटीटीवर क्राइम-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर एक दाक्षिणात्य चित्रपट चुकवू नका. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटात सामान्य माणसाचा संघर्ष, सत्ता आणि पोलिसांच्या क्रूरतेचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट कोणता, त्याची कथा काय आणि तो कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊयात.
चित्रपटाचे नाव व कथा
Viduthalai Part 1 on OTT: ‘विदुथलाई: पार्ट 1’ चित्रपटाची कथा १९८७ च्या पार्श्वभूमीवर घडते. कुमारेसन (सुरी) नावाचा एक तरुण पोलीस विभागात ड्रायव्हर म्हणून भरती होतो आणि त्याची नियुक्ती डोंगराळ भागातील एका दुर्गम पोलीस कॅम्पमध्ये केली जाते. तो एक साधा ड्रायव्हर असतो आणि पोलिसांचा खूप आदर करणारा असतो.
त्या भागात ‘पीपल्स आर्मी’ नावाचा एक गट सरकारविरुद्ध सशस्त्र लढा देत असतो, ज्याचा प्रमुख नेता ‘पेरुमल वाथियार’ (विजय सेतुपती) असतो. पोलीस वाथियारला पकडण्यासाठी ‘ऑपरेशन घोस्ट हंट’ राबवतात. या मोहिमेसाठी पोलीस जो मार्ग अवलंबतात तो माणुसकीला काळीमा फासणारा असतो. साध्या आणि प्रामाणिक कुमारेसनची नैतिक मूल्ये आणि पोलिसांची क्रूरता यांच्यात कसा संघर्ष होतो, याचे चित्रण यात दाखवण्यात आले आहे.
‘विदुथलाई: पार्ट 1’ का पाहावा?
सुरी हे तमिळ चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात, परंतु ‘विदुथलाई: पार्ट 1’ मधील त्यांच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या डोळ्यातील निरागसता आणि पोलीस प्रशिक्षणादरम्यान त्यांनी सहन केलेल्या अपमानाचे दुःख प्रेक्षकांना काळजाला भिडते. विजय सेतुपती चित्रपटात खूप कमी काळासाठी दिसतो, परंतु कमी काळातही त्याची भूमिका छाप सोडते.
कुठे पाहायला ‘विदुथलाई: पार्ट 1’?
‘विदुथलाई: पार्ट 1’ हा चित्रपट तुम्ही हिंदीत ZEE5 वर पाहू शकता. विचार करायला भाग पाडणारे, संवेदनशील, सामाजिक चित्रपट पाहायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ‘विदुथलाई: पार्ट 1’ नक्की पाहायला हवा.
खास गोष्ट म्हणजे ‘विदुथलाई: पार्ट 1’चा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२४ मध्ये आलेल्या ‘विदुथलाई: पार्ट 2’ ला आयएमडीबीवर 7.6 व रोटन टोमॅटोजवर 70% रेटिंग मिळाले आहे. ‘विदुथलाई: पार्ट 1’ पाहिल्यानंतर तुम्ही झी5 दुसरा भाग पाहू शकता.
‘विदुथलाई: पार्ट 1’ला आयएमडीबीवर १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वेत्रिमारनने केलं आहे. यात सूरी व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत.

