प्राजक्ता कोळी लोकप्रिय यूट्यूबर व अभिनेत्री आहे. अलीकडेच ती हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती महाविद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिकेत झळकली. अशातच येत्या काळात प्राजक्ताची नवी सीरिज येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्राजक्ता कोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचा तिथे मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. यूट्यूबर म्हणून सुरुवात केलेल्या प्राजक्ताने पुढे जाऊन बॉलिवूडमधील चित्रपट व सीरिजमध्ये काम केलं. त्यानंतर ती मराठी चित्रपटातही झळकली. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्याबरोबरच प्राजक्ता अभिनय तर करतेच. पण, याचबरोबर तिला लिखाणाचीसुद्धा आवड आहे. प्राजक्ताने Too Good To Be True ही कादंबरी लिहिली आहे. जी जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालं. तिच्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि अनेकांची या कादंबरीला पसंती मिळाली. Too Good To Be True ही एक रोमँटिक नॉव्हेल (कादंबरी) आहे. पण, आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

प्राजक्ताच्या कादंबरीवर आधारित सीरिज नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित?

प्राजक्ताच्या याच रोमँटिक नॉव्हेलवर आधारित सीरीज येणार असल्याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे माध्यमांच्या वृत्तानुसार अभिनेत्री स्वतः यामध्ये मुख्य भूमिकेत असून नेटफ्लिक्स व प्राजक्ता यांच्यामध्ये याबद्दल बोलणं सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. प्राजक्तानं यापूर्वी ‘मिसमॅच्ड’ या लोकप्रिय सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सीरिजचे ३ सीझन आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या व दुसऱ्या सीझनला तुफान प्रतिसाद मिळ्यानंतर गेल्या वर्षी तिसरा सीझन रिलीज झालेला. या सीरिजसह तिनं इतरही हिंदी सीरिजमध्ये काम केलं आहे. पण, आता प्राजक्ता स्वतःच लिहिलेल्या रोमँटिक नॉव्हेलवर आधारित सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असल्यामुळे ही तिच्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे.

Award Banner

प्राजक्तानं आजवर काम केलेल्या प्रत्येक कलाकृतीला तिच्या चहात्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठीसुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या नवीन सीरिज मधून प्राजक्ताला पहाणं रंजक ठरेल. ही सीरिज कधी प्रदर्शित होणार, काय नाव असेल तसंच प्राजक्ताबरोबर इतर कोणते कलाकार असतील याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, अलीकडे प्राजक्ता ‘मिसमॅच्ड’, ‘क्रांतिज्योती महाविद्यालय – मराठी माध्यम’, सिंगल पापा यांसारख्या कलाकृतींमधून झळकली. या सर्व कलाकृतींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल.