Prajakta Mali’s Phullwanti Trending On OTT : अलीकडे अनेक सिनेमाप्रेमी ओटीटीवर सिनेमे वा सीरिज पाहण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात ओटीटीवर कोणता नवीन सिनेमा किंवा सीरिज रिलीज होतेय, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली असते.

ओटीटीवर हिंदीसह अनेक मराठी कलाकृतींनादेखील प्रेक्षकांकडून पसंती मिळताना दिसते. प्रेक्षक पसंतीमुळेच ओटीटीवर कलाकृती ट्रेंडिंगमध्ये येतात. अशातच ओटीटीवर सध्या एक मराठी सिनेमा पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. काय आहे या सिनेमाचं नाव? चला जाणून घेऊ…

आपण ज्या सिनेमाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव आहे ‘फुलवंती. साधारण दोनवर्षांपूर्वी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. सिनेमागृहांत या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अॅमेझॉन प्राईम या ओटीटी माध्यमावर हा सिनेमा रिलीज झाला होता. अॅमेझॉन प्राईमवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

अॅमेझॉन प्राईमनंतर ‘फुलवंती’ Waves या ओटीटी माध्यमावर रिलीज झाला होता. गेल्या आठवड्यातच ‘फुलवंती’ Waves वर रिलीज झाला होता आणि अवघ्या काही दिवसांत हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. Waves वर रिलीज होताच हा सिनेमा पाहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. याबद्दल प्राजक्ताने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘फुलवंती’ सिनेमाची कथा…

‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. सिनेमात प्राजक्ताने ही भूमिका साकारली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचे पुण्यात पेशवे दरबारात येणे होतं. तिथे तिची भेट नरसिंह शास्त्री यांच्याशी होते. ही भूमिका अभिनेता गश्मीर महाजनीने साकारली आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि ‘शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आली आहे.

Prajakta Mali's Phullwanti Trending On OTT
प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड

‘फुलवंती’मधील कलाकार…

दरम्यान, ‘फुलवंती’बद्दल सांगायचे झाल्यास, या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच इतर प्रसाद ओक, हृषिकेश जोशी. स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर अन् समीर चौघुलेसह अनेक मराठी कलाकार आहेत. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडेंनी केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तर अविनाश-विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता माळीने या सिनेमाची निर्माती म्हणूनही भूमिका निभावली आहे.