12th Fail चित्रपट गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी घराघरांत लोकप्रिय झाला. 12th Fail नंतर आता विक्रांतचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्लॅकआऊट’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या थ्रिलर ड्रामा असलेल्या सिनेमात विक्रांतसह अभिनेत्री मौनी रॉय प्रमुख भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेता प्रसाद ओकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

छाया कदम आणि प्रसाद ओक हे मराठी कलाकार विक्रांत मेस्सीबरोबर ‘ब्लॅकआऊट’ चित्रपटात झळकणार आहेत. यासंदर्भात अभिनेत्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. चित्रपटात विक्रांत मेस्सी, मौनी रॉय, सुनील ग्रोव्हर, फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणे, सौरभ घाडगे, जिशू सेनगुप्ता, रुहानी शर्मा, प्रसाद ओक, छाया कदम, अनंत जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : शाहरुख खान ते ऐश्वर्या राय; सगळ्या बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत दीपिका पदुकोण ठरली अव्वल! काय आहे कारण?

चित्रपट कधी व कुठे पाहता येणार?

‘ब्लॅकआऊट’ चित्रपटाचा ट्रेलर उद्या ( ३० मे २०२४ ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट ७ जूनला प्रदर्शित होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं घरबसल्या भरभरून मनोरंजन होणार आहे.

सध्या प्रसाद ओक आणि छाया कदम हे दोन मराठी कलाकार ‘ब्लॅकआऊट’मध्ये झळकणार आहेत. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रसाद ओकला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखलं जातं. आजवर मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय छाया कदम यांच्याविषयी सांगायचं झालं, तर सध्या कलाविश्वात त्यांचं नवा चांगलंच चर्चेत आहे. अभिनेत्रीची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ या चित्रपटाचा कान्स महोत्सवात सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय याआधी त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’सारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष

दरम्यान, सध्या या चित्रपटाच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मंजिरी ओक, सिद्धार्थ जाधव, रीतिका श्रोत्री या कलाकारांनी कमेंट्स करत या कलाकारांना ‘ब्लॅकआऊट’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.