Pritam and Pedro Views Record: दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्यांचा मुलगा वीर हिरानी यांनी ओटीटी विश्वात आपल्या नव्या वेब सीरिजद्वारे नवा इतिहास रचला आहे. जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या सायबर क्राइम कॉमेडी-थ्रिलर सीरिजला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ३.१ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ७.३ कोटी वॉच आवर्स मिळवत या सीरिजने आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज बनण्याचा मान पटकावला आहे. अरशद वारसी, वीर हिरानी, विक्रांत मॅस्सी, श्रुती मराठे, बोमन इराणी आणि मोना सिंह यांच्या अभिनयाने सजलेली ही सीरिज प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत आहे.

गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजची कथा पेड्रो (अरशद वारसी) आणि प्रीतम (वीर हिरानी) यांच्या अनोख्या जोडीभोवती फिरते. पेड्रो हा जुन्या विचारांचा पोलीस अधिकारी आहे. त्याची बदली आयटी सेलमध्ये होते, तर प्रीतम हा टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असतो. तो कोडिंग जीनियस असतो, पण व्हॅक्यूम क्लिनर विकत असतो. एका चोरीमुळे ते दोघे भेटतात. त्यानंतर प्रीतम पेड्रोला सायबर क्राइमचे गुन्हे सोडवण्यास मदत करतो. पण पुढे प्रीतमच्याच बाबतीत असं काही घडतं की सर्वजण चक्रावतात. राजकुमार हिरानी यांच्या खास शैलीतील ही सीरिज तुम्हाला हसवते, विचार करायचा आणि शेवटपर्यंत पाहायला भाग पाडते.

सीरिजला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘राजकुमार हिरानी फिल्म्स’ने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे आभार मानले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “प्रीतम अँड पेड्रो सतत लोकांच्या मनावर राज्य करत आहेत,” असं लिहिलंय.

प्रीतम अँड पेड्रोचा ट्रेलर

जिओ हॉटस्टारवरील ‘प्रीतम अँड पेड्रो’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजला आतापर्यंत ३.१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. तब्बल ७.३ कोटी वॉच आवर्ससह ही आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे.

अरशद वारसीने तर उत्तम काम केलंय. त्याचबरोबर श्रुती मराठेनेही तिची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. पण या सीरिजमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते प्रीतम साकारणाऱ्या वीर हिरानीने. वीरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सीरिजमधील त्याचा सहज अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. राजकुमार हिरानी आणि वीर हिरानी या बाप-लेकाच्या जोडीने सीरिजचा सध्या ओटीटीवर जलवा पाहायला मिळतोय.