Priya Bapat and Umesh Kamat New Web Series : प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे. मालिका, चित्रपट, नाटकांसह ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरून प्रेम दिले आहे.

‘टाइम प्लीज’ या चित्रपटानंतर गेल्या वर्षी दोघांचा एकत्र ‘बिन लग्नाची गोष्ट’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर उमेश-प्रिया पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. लवकरच दोघे ओटीटीवरील वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘आणखी काय हवं?’नंतर ‘हे काय नवीन?’

उमेश कामत आणि प्रिया बापट ‘आणखी काय हवं?’ या वेबसीरिजला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यानंतर अशीच एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजचे नाव आहे ‘हे काय नवीन?’

या सीरिजची कथा रमा (प्रिया बापट) आणि आदित्य (उमेश कामत) या जोडप्याभोवती फिरते, ज्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वतःचे घर, करिअर आणि एक सुखी संसार असं सर्वकाही सुरळीत असूनही त्यांच्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की ‘आता पुढे काय?’. रमा आपल्या रोजच्या जगण्यातून ब्रेक घेऊन स्वतःचा एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेते. पुढे नवीन नात्यांमुळे आणि सामाजिक अपेक्षांमुळे रमा आणि आदित्यच्या नात्यात काही अनपेक्षित वळण येतात, असे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया बापट म्हणाली की, रमा हे पात्र प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या जवळचे वाटेल, कारण ती खूप खरी आहे. स्वतःची ओळख आणि जबाबदारीच्या संघर्षात अडकलेल्या स्त्रियांचे ती प्रतिनिधित्व करते.

‘हे काय नवीन?’ वेब सीरिजचा ट्रेलर

‘हे काय नवीन?’ मधील कलाकार

दरम्यान, या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याबरोबरच शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर वरुण नार्वेकरने या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ‘हे काय नवीन?’ ही वेबसीरिज येत्या ३१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.