Priya Bapat New Movie Dalimb: प्रिया बापट मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक आणि आता सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. मराठीसह तिने हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विशेष करून हिंदी सीरिजमध्ये काम करत तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली.
मराठीतील अनेक कलाकार सध्या हिंदी ओटीटीविश्व गाजवत आहेत. त्यापैकी प्रिया बापटही एक आहे. परंतु, प्रिया नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींना पसंती देताना दिसते. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या नवीन चित्रपटाची माहिती शेअर केली आहे. होळीचं औचित्य साधून अभिनेत्रीने चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावरून शेअर केलं आहे.
ओटीटीवर प्रदर्शित होणार प्रिया बापटचा ‘हा’ चित्रपट
प्रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ‘होळी फक्त रंगाचा सण नाहीये तर ती एक वॉर्निंग आहे’ असी कॅप्शन दिली आहे. प्रिया बापटच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘डाळिंब’ आहे. तिचा हा हिंदी चित्रपट ओटीटीवर झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. प्रिया अवेनने या चित्रपटाच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तनुज गर्ग व अतुल कसबेकर यांनी याची निर्मिती केली आहे.
‘पंचायत’ या लोकप्रिय सीरिजमधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता जितेंद्र कुमार यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रियाच्या भूमिकेबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, आतापर्यंत तिने सर्व हिंदी सीरिज आणि ओटीटीवरील हिंदी चित्रपटांत महत्त्वपू्र्ण आणि प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे ‘डाळिंब’ या चित्रपटातून ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल.
प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टमधून हा चित्रपट लवकरच ओटीटीवर झी ५ वर प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु, अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. यासह प्रिया व जितेंद्र यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार आणि या चित्रपटाची कथा नेमकी कशी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच मिळतील. प्रिया बापट व जितेंद्र कुमार पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. दोघेही ओटीटीवरील लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या दोघांना एकत्र पाहणं रंजक ठरेल.
दरम्यान, प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. प्रिया नाटक, चित्रपट आणि सीरिज या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
