हल्ली ओटीटीमुळे वेब सीरिजची डिमांड वाढली आहे. विविध विषय यामधून प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतात. त्यांचे आवडते कलाकार वेगवेगळ्या भूमिकेतून ओटीटीमुळे त्यांना घरबसल्या पाहायला मिळतात, त्यामुळे आता हे मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. यामुळेच अनेक कलाकारसुद्धा चित्रपट, नाटक व मालिकांव्यतिरिक्त ओटीटीवरही काम करण्यासाठी उत्सुक असतात.

हिंदीसह आता मराठी कलाकारही मोठ्या प्रमाणात ओटीटीवरील वेब सीरिजमधून झळकताना दिसत आहेत. फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषांमधील सीरिज व चित्रपटांतही ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीसुद्धा लवकरच ओटीटीवरील नव्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जोडी म्हणजेच प्रिया बापट व उमेश कामत लवकरच त्यांच्या आगामी सीरिजमधून एकत्र झळकणार आहेत.

प्रिया व उमेश या जोडीने आतापर्यंत अनेकदा एकत्र काम केलं आहे. पण, मधल्या काळात ही जोडी फार एकत्र ऑनस्क्रीन दिसली नाही. त्यानंतर त्यांनी वेब सीरिज, नाटक आणि चित्रपटात पुन्हा एकत्र काम करायला सुरुवात केली. प्रिया व उमेश यांची ‘आणि काय हवं’ ही सीरिज खूप लोकप्रिय झाली होती. दोघांमधील केमिस्ट्री, त्यांच्यातील गमतीशीर संवाद प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतात. अशातच आता लवकरच ही जोडी ‘हे काय नवीन?’ या आगामी सीरिजमधून पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही परवणी असणार आहे. घरबसल्या त्यांना ओटीटीवरील या सीरिजमधून प्रिया व उमेश यांना एकत्र पाहता येणार आहे.

कधी व कुठे पाहायची?

वरुण नार्वेकर लिखित व दिग्दर्शित ‘हे काय नवीन?’ ही सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहायला मिळणार आहे. ही सीरिज २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून याची प्रेक्षक वाट पाहत होते. पण, आता अखेर त्यांना ही सीरिज लवकरच पाहता येणार आहे. ‘आणि काय हवं’ या लोकप्रिय सीरिजनंतर आता ‘हे काय नवीन?’ या सीरिजमधून काय वेगळं पाहायला मिळणार, प्रिया व उमेश यांच्या भूमिका कशा असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

प्रिया बापट व उमेश कामत यांच्या ‘हे काय नवीन?’ या सीरिजबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ९ ते ५ ची नोकरी, मातृत्व, व्यवसाय, चाळिशीनंतरचं आयुष्य, कुटुंब नियोजन यांसारख्या हल्लीच्या सामान्य जोडप्यांच्या आयुष्यातील गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं सीरिजच्या पोस्टरवरून दिसतं.