Weekend Ott Watchlist : वीकेंड आला की काय पाहायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. या वीकेंडला ओटीटीवर काय प्रदर्शित झालं आहे. कोणत्या सीरिज किंवा चित्रपट घरबसल्या पाहता येतील या शोधात अनेक जण असतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही सीरिज व चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जी तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

फेब्रुवारी महिन्यातील हा शेवटचा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कारण- या आठवड्यात अनेक नवीन सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये प्रियांका चोप्राचा अॅक्शन चित्रपट ‘द ब्लफ’, ‘इक्कीस’, ‘सायको सैय्या’ यांसारखे चित्रपट व सीरिज रीलीज होणार आहेत.


वीकेंडला ओटीटीवर पाहा ‘या’ कलाकृती

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट व सीरिजच्या यादीतील पहिलं नाव आहे ‘सायको सय्या’ या सीरिजचं. ही एक थ्रिलर सीरिज आहे. त्यामध्ये उज्जैनमध्ये राहणार्‍या मुलाची गोष्ट पाहायला मिळते, जो प्रेमात पडल्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं, भावनिक संघर्ष यामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये अभिनेते रवी किशनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त सीरिजमध्ये अभिनेत्री अश्विनी काळसेकर, सुरभी चंदना, सृष्टी श्रीवास्त्व महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाली आहे.

द ब्लफ – प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेला हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये प्रियांका चोप्राने एर्सेल ब्लडी मेरी बोडेन ही भूमिका साकारली आहे. जी कधी काळी समुद्री डाकू राहिलेली असते. परंतु, कालंतराने ती तिच्या पतीबरोबर हे सगळं मागे सोडून नवीन आयुष्य जगत असते. परंतु, तिचा जुना शत्रू तिच्यावर सूड उगवण्यासाठी पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि तेव्हाच या चित्रपटात ट्विस्ट येतो. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

इक्कीस – यामध्ये अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. अगस्त्य नंदाने हुतात्मा जवान अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला. परंतु, त्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अशातच आता धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

संगमरमर – राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ही एक कौटुंबिक सीरिज आहे. त्यामध्ये शीन सविता दास व सौरभ राज जैन हे कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. त्यामध्ये दोघांची ऑनस्क्रीन प्रेमकहाणी पाहायला मिळते. २६ फेब्रुवारीपासून ही सीरिज जिओ हॉटस्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

अक्युज्ड – यामध्ये कोंकणा सेन शर्माने गायनेकॉलॉजिस्टची प्रमुख भूमिका साकारली आहे, जी एक नामांकित डॉक्टर असते; परंतु तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेला असतो. त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात मोठं वादळ येतं. या सीरिजची गोष्ट कशी पुढे जाते, त्यामुळे तिच्या लग्नात काय अडथळे निर्माण होतात हे यात पाहायला मिळतं. ‘लापता लेडीज’मधून लोकप्रियता मिळवलेली प्रतिभा रांटा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळते. २७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

सीक्रेट स्टोरीज – ही एक सायकॉलॉजिकल थ्रिलर मल्याळम सीरिज आहे. ‘दृष्यम’चे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये रोजलिनची गोष्ट पाहायला मिळते, जी खूप अभ्यासू असते. परंतु, तिला दररोज स्वप्नात हिरव्या रंगाचे डोळे असलेला माणूस दिसतो, जो तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. ती याबद्दल घरी सांगते तेव्हा ती खूप विचार करते, असं म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु, पुढे अशाच रंगाचे डोळे असणारा माणूस त्यांच्या घरी येतो तेव्हा यामध्ये मोठा ट्विस्ट येतो, असं पाहायला मिळतं.