हॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. ज्याची जगभरातील प्रेक्षकांमध्ये चर्चा होत असते. त्यात ओटीटीमुळे तर प्रेक्षकांना घरबसल्या जगभरातील कलाकृतींचा आनंद घेता येतो. अशातच आता काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि जगभरात कोट्यवधी कमावलेला असाच एक हॉलीवूड चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे

२०२६मधील आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलेला ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हॉलीवूड अभिनेता रायन गॉसलिंगची प्रमुख भूमिका असलेल्या साय-फाय चित्रपटात त्याने पृथ्वीला वाचवण्याच्या मोहिमेवर निघालेल्या विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली होती, तसंच थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात ६०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाईही केली होती.

ओटीटीवर कुठे पाहायचा?

बुधवारी प्राइम व्हिडिओने घोषणा केली की, ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ हा चित्रपट ३ जुलैपासून जगभरातील प्रेक्षकांसाठी ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. फिल लॉर्ड आणि ख्रिस्तोफर मिलर या दिग्दर्शक जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ड्रू गॉडर्ड यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, एमी पास्कल, रायन गॉसलिंग, फिल लॉर्ड, ख्रिस्तोफर मिलर, अँडी वियर, रॅचेल ओ’कॉनर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, रायलंड ग्रेस (रायन गॉसलिंग) हा विज्ञान शिक्षक अंतराळात जागा होतो. त्याला आपण कोण आहोत किंवा तिथे कसे पोहोचलो, याबद्दल काहीच आठवत नसतं. हळूहळू त्याची स्मृती परत येऊ लागते आणि त्याला खरे उद्दिष्ट समजतात. सूर्य हळूहळू नष्ट होण्यामागील गूढ रहस्य उलगडून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश टाळणे, ही त्याची जबाबदारी असते. त्यासाठी तो आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा आणि वेगळ्या कल्पनांचा वापर करतो. मात्र, या धोकादायक प्रवासात त्याला अनपेक्षितपणे एक नवीन मैत्रिण भेटते जी त्याला या प्रवासात साथ देते.

२० मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत जगभरात ६८३ दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई केली. चित्रपटातील VFX आणि ‘रॉकी’ या परग्रहावरील पात्राची रचना यांचं विशेष कौतुक झालं. अनेक प्रेक्षकांनी आयमॅक्समधील हा चित्रपट पाहण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचं म्हटलं.