दाक्षिणात्य चित्रपटांची आणि सीरिजचा प्रेक्षकांमध्ये कायमच प्रचंड क्रेझ असते. विविध धाटणीचे आणि नेहमी वेगळं कथानक असलेले दाक्षिणात्य चित्रपट व सीरिज कायमच प्रेक्षकांच्या पसंती पडतात. अशातच आता अजून एक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे.

‘प्यार प्रेमा काधल’ या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळवलेला आणि कौतुकाची थाप मिळवलेला दिग्दर्शक एलन आता ‘प्यार प्रेमा कल्याणम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या रोमँटिक चित्रपटात सान्वी मेघना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार असून, हा चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘प्यार प्रेमा कल्याणम’ कधी आणि कुठे पाहता येणार?

चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘प्यार प्रेमा कल्याणम’च्या ओटीटी प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता थेट नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. ‘प्यार प्रेमा कल्याणम’ हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘प्यार प्रेमा कल्याणम’ हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

‘प्यार प्रेमा कल्याणम’ची कथा काय आहे?

‘प्यार प्रेमा कल्याणम’ची कथा पवी या लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरभोवती फिरते. लग्नानंतरही आई-वडिलांचं घर सोडून सासरी जाण्यास ती स्पष्ट नकार देते. परंपरेप्रमाणे पत्नीने सासरी जाण्याऐवजी तिचा पतीच तिच्या माहेरी राहायला येण्याचा निर्णय घेतो. यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक मजेशीर आणि अनपेक्षित गोष्टी घडू लागतात. दोघांना कौटुंबिक मतभेद, बदलत्या अपेक्षा आणि सांस्कृतिक फरकांचा सामना करावा लागतो. या सगळ्या घडामोडींमधून उलगडणारी ही कथा मनोरंजनासह कौटुंबिक नात्यांवरही भाष्य करते.

लग्नानंतर आयुष्यात पुढे जात असताना, आनंद हा नेहमीच जुन्या परंपरा पाळण्यात नसतो, याची जाणीव या जोडप्याला हळूहळू होऊ लागते. लग्न आणि नातेसंबंधांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारी ही कथा मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे. या चित्रपटाक राधिका सरथकुमार, योगी बाबू, एम. एस. भास्कर, गीता कैलासम, एलांगो कुमारवेल, सेन्थिल आणि मारन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.