Raakh Web Series Prime Video Ali Fazal: प्राइम व्हिडीओवर दर आठवड्याला नवीन सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होतात, पण काही मात्र पहिल्याच आठवड्यात टॉप १० च्या यादीतून बाहेर पडतात. मात्र, आम्ही तुम्हाला अशा एका सीरीजबद्दल सांगणार आहोत, जी फक्त एक किंवा दोन आठवडेच नाही, तर तब्बल ४१ दिवसांपासून टॉप ५ सीरीजच्या यादीत टिकून आहे. विशेष म्हणजे, ८ एपिसोडच्या या क्राईम थ्रिलर सीरीजची कथा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. ही सीरिज गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत राहिली. आता पुन्हा एकदा टॉप १० मध्ये ट्रेंड होत आहे. या क्राईम थ्रिलर सीरिजचं नाव ‘राख’ (Raakh) आहे.

‘राख’ ही सीरीज १२ जूनपासून भारतात हिंदी भाषेत रिलीज झाली. ती जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. ‘फ्लिक्स पेट्रोल’नुसार, भारतातील टॉप १० सीरिज आणि चित्रपटांच्या एकत्रित यादीत ‘राख’ सहाव्या क्रमांकावर आहे, तर केवळ टॉप १० सीरिजच्या यादीत ती चौथ्या क्रमांकावर आहे.

सत्य घटनेवर आधारित आहे ‘राख’

‘राख’ ही क्राईम थ्रिलर सिरीज १९७८ मधील कुख्यात आणि धक्कादायक ‘रंगा-बिल्ला केस’ वर आधारित आहे. २६ ऑगस्ट १९७८ रोजी नवी दिल्लीत एका नेव्ही ऑफिसरची १६ वर्षांची मुलगी गीता चोप्रा आणि तिचा १३ वर्षांचा लहान भाऊ संजय चोप्रा यांचे अपहरण झाले होते. मुसळधार पावसात लिफ्ट घेताना या दोन्ही मुलांचे अपहरण करण्यात आले होते आणि दोन दिवसांनंतर त्यांचे मृतदेह सापडले होते. या प्रकरणात कुलजीत सिंह (रंगा) आणि जसबीर सिंह (बिल्ला) यांना अटक करण्यात आली होती आणि ३१ जानेवारी १९८२ रोजी त्यांना फाशी देण्यात आली होती.

प्राइम ओरिजिनलची ही इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर वेब सीरिज १९७० च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित एक काल्पनिक कथा आहे. यात बाबू (आकाश मखीजा) आणि रज्जो (रमनदीप यादव) यांचा गुन्हेगार बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. दोन लहान मुलांच्या हत्येनंतर सब-इन्स्पेक्टर जयप्रकाश (अली फझल) त्यांना पकडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात.

‘राख’ ही एक काल्पनिक क्राईम-थ्रिलर सीरिज आहे. याचं दिग्दर्शन प्रोसित रॉने केलं आहे. या सीरिजमध्ये अली फझल, आकाश मखीजा, सोनाली बेंद्रे, राकेश बेदी, आमीर बशीर आणि रमनदीप यादव हे कलाकार आहेत.