ओटीटीवर सध्या क्राइम, अॅक्शन व सस्पेन्स थ्रिलर कंटेंटचा पूर आला आहे. याचदरम्यान काही हलक्या फुलक्या फॅमिली सीरिजनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यात प्रामुख्याने ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘ग्राम चिकित्सालय’ व ‘दुपहिया’ या सीरिजचा समावेश आहे. कंटेंट उत्तम असला की प्रेक्षक आकर्षित होतात, हे या सीरिजनी दाखवून दिलं.
‘पंचायत’ व ‘गुल्लक’ या विनोदी वेब सीरिज तुम्ही पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा एका सीरिजबद्दल सांगतोय, जिचे रेटिंग ‘पंचायत’, ‘मिर्झापूर’ व ‘दुपहिया’ पेक्षा चांगले आहे. या सीरिजचा कंटेंट चांगला आहे, पण तरीही तिला तेवढी लोकप्रियता व प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नाही.
या सीरिजचं नाव आहे ‘रात जवान है’. ही सीरिज २०२४ मध्ये सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली. या सीरिजचे आठ एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड ३०-४० मिनिटांचा आहे. ही सीरिज तुम्हाला हसवते, रडवते. आताच्या पिढीच्या पालकत्वावर आधारित ही सीरिज आहे. तरुण पिढीच्या समस्या, मुलं सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय या गोष्टींचा विचार करायला ही सीरिज भाग पाडते.
तीन मित्रांची गोष्ट आहे ही सीरिज
‘रात जवान है’ या सीरिजचं दिग्दर्शन ‘ट्रिपलिंग’ दिग्दर्शित करणाऱ्या सुमित व्यासने केलं आहे. सुमितने यात मैत्री, पालकत्व, संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब, जोडीदारांमधील सांस्कृतिक विविधता, भावनिक अडचणी या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत. ‘रात जवान है’ ची कथा आनंद-पुथरनने लिहिली आहे. ही तीन मित्रांची गोष्ट आहे. कुटुंब व पालकत्व या सीरिजमध्ये उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
आयएमडीबीवर ८.२ रेटिंग
‘रात जवान है’ सीरिजला आयएमडीबीवर ८.२ रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ‘असुर’ फेम बरुण सोबती मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर हुरहुन्नरी मराठी अभिनेत्री प्रिया बापट व अंजली आनंद हे कलाकार आहेत. हे तिघेही बेस्ट फ्रेंड असतात आणि तिघांनाही छोटी मुलं असतात.
‘रात जवान है’मध्ये पालकत्व सकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. तिशीनंतर जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक वेगळा भावनिक टप्पा सुरू होतो, तेव्हा बाळाला सांभाळत त्या गोष्टींशी डील करणं अनेकांना अवघड जातं. अनेक समस्या येतात, त्या अतिशय उत्तम पद्धतीने यात दाखवण्यात आल्या आहेत.
सीरिजमध्ये बरुण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट यांची मैत्री आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवते. कितीही अडचणी आल्या तरी त्याला हसून सामोरं जायची हिंमत ही सीरिज देते. ‘रात जवान है’ ही सीरिज वरुण धवन व समांथाची ‘सिटाडेलः हनी बनी’ व ‘आईसी814: द कंधार हाईजॅक’वर भारी पडली होती. पण या दोन्हीच्या तुलनेत ‘रात जवान है’ सीरिजला जास्त लाइमलाइट मिळाली नाही.