Aliya Bhatt’s Movie Trending in Pakistan : ओटीटीमुळे घरबसल्या प्रेक्षकांना जगभरातील विविध भाषेतील आणि कलाकारांचे चित्रपट, सीरिज पाहता येतात, त्यामुळे अनेकदा बाहेरच्या देशातील कलाकृती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात; तर कधी आपल्या देशातील चित्रपट इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. ओटीटीमुळे हे आता अधिक सोपं झालं आहे.

ओटीटीमुळे स्पाय, थ्रिलर, क्राइम आणि कॉमेडी अशा विविध जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतात, तर सध्या स्पाय अॅक्शन थ्रिलर या चित्रपटांची क्रेझ आहे. या धाटणीचे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता पाकिस्तानमध्ये याच धाटणीचा एक बॉलीवूड चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंग आहे आलियाचा राजी चित्रपट

२०१८ मध्ये थिएटरमध्ये रिलील झालेला मेघना गुलजार दिग्दर्शित स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आता ओटीटीवर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या चित्रपटाचं नाव आहे राजी आणि यामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. तिनं यामध्ये सेहमत खान हे पात्र साकारलं आहे. यामध्ये एका गुप्तहेराची गोष्ट दाखवली आहे. आलिया भट्ट चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.

Award Banner

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर आलिया एका भारतीय मुस्लीम मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळते, जी लग्न करून पाकिस्तानात जाते. तिथे ती गुप्तहेर म्हणून जाते. तिच्या पतीच्या भूमिकेत विकी कौशल आहे, ज्याचा शेवटी मृत्यू होतो. देशासाठी एक स्त्री तिचे आयुष्य पणाला लावते असं पाहायला मिळतं. चित्रपटाच्या शेवटी आलिया गरोदर असल्याचं तिला कळतं, तेव्हा ती मायदेशी भारतात परतलेली असते.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा पुरस्कार विजेता चित्रपट नेटफ्लिक्सवर पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंग आहे. अनेक लोक हा चित्रपट पहात आहेत. तिथल्या प्रेक्षकांचा याला इतका प्रतिसाद मिळत आहे की तिथे हा नेटफ्लिक्सवर टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे. आलिया भट्ट व विकी कौशल यांचा हा चित्रपट पाकिस्तानमध्ये नवव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून तिकडे हा चित्रपट ट्रेंड करतोय.