Thaai Kizhavi Movie OTT Release Update : काही दिवसांत कमी बजेट असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी गुजराती सिनेमा ‘लालो’ची देशभरत चर्चा झाली. त्यानंतर आणखी एका दाक्षिणात्य सिनेमाची चर्चा रंगली. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेतील हा चित्रपट मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं; पण या चित्रपटानं कुठल्याही मोठ्या स्टारशिवाय बॉक्स ऑफिस गाजवलं. अखेर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘थाई किझवी’ (Thaai Kizhavi).
‘थाई किझवी’ ओटीटीवर रिलीज
हा चित्रपट २०२६ मधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये दमदार कमाई केल्यानंतर आता थाई किझवी हा चित्रपट १० एप्रिलपासून ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ldयाबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.
‘थाई किझवी’च्या कमाईबद्दल…
‘थाई किझवी’ या तमीळ चित्रपटाने जगभरात सुमारे ८० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, तमीळ चित्रपटसृष्टीत सध्या याच चित्रपटाची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात ६१.३४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला, तर जागतिक स्तरावर ८०.६१ कोटींची कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ८० लाख रुपये कमावले होते; पण दमदार कथेमुळे हा चित्रपट ८० कोटींच्या पार गेला.
‘थाई किझवी’ची कथा काय आहे?
या चित्रपटाची कथा पावनुथाई (राधिका सरथकुमार) नावाच्या एका ७० वर्षांच्या महिलेभोवती फिरते. तिची मुले तिच्याकडे संपत्तीची वाटणी करून, ती त्यांच्या नावावर करण्याची मागणी करतात. मात्र, जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय ती घेते. पुढे तिला अर्धांगवायूचा (Paralysis) झटका येतो आणि केवळ संपत्तीच्या आशेने तिची मुले पुन्हा तिच्याकडे परततात. त्यानंतर सिनेमाच्या कथेत अनेक रंजक वळणे येतात.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सिंगमपुली, अरुलदॉस व बाला सरवणन या कलाकारांच्याच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे आता ज्यांना हा सिनेमा चित्रपटगृहात बघता आला नसेल, तर त्यांना आता हा सिनेमा घरबसल्या ओटीटीवर पाहण्याची संधी आहे.
