दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्या सुपरहिट ‘जेलर २’ला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. रजनीकांत मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट ओटीटीवर कधी व कुठे पाहता येणार आहे. जाणून घेऊ.
जागतिक आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ८०० कोटींहून अधिक गल्ला जमावलेला रजनीकांत अभिनीत ‘जेलर २’ हा चित्रपट आता ज्यांनी चित्रपटगृहात पाहिला नाही त्यांना ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे. प्राइम व्हिडीओने सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे. “टायगर मुथुवेल पांडियन पुन्हा एकदा परतला आहे. अधिक दमदार अंदाजात!” अशी कॅप्शन देत त्यांनी ही घोषणा केली. रजनीकांत यांचा ‘जेलर २’ हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदीतही पाहता येणार आहे.
नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शन केलेल्या या अॅक्शन क्राइम ड्रामा चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन यांनी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटात मोहनलाल, हृतिक रोशन आणि विजय सेतुपती यांची विशेष उपस्थिती आहे. त्यांच्याबरोबरच एस. जे. सूर्या, शिवराजकुमार, सूरज वेंजारामूडू, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, रम्या कृष्णन, नामो नारायण आणि योगी बाबू यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘जेलर २’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरूच!
रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानसार चित्रपटाने कमाईचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ४ नोव्हेंबर, बुधवारी चित्रपटाने भारतात ३ कोटी रुपयांची कमाई केली. विविध भाषांमधील एकूण ८,००४ शोमधून ही कमाई झाली. त्यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ४६६.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ५४५.१० कोटी रुपये झालं आहे. चित्रपटाला परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या २१व्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून चित्रपटाने ७५ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कलेक्शन २७६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परिणामी, ‘जेलर २’ची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई ८२१.१० कोटी रुपये झाली आहे.
