तब्बल १३ वर्षांनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘शाहिद’ अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. तुम्हाला ‘शाहिद’ चित्रपट तुम्हाला ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येईल. या चित्रपटात राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे लेखक आणि संपादक अपूर्व एम. असरानी यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच्या प्रवासावर त्यांनी भाष्य केलं. तसेच या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाहिद’ चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. त्यांची २०१० मध्ये हत्या झाली होती. राजकुमार रावने आझमी यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर मोहम्मद झीशान अय्युब, प्रभलीन संधू आणि बलजिंदर कौर यांनीही इतर सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला शाहिद

‘शाहिद’चा वर्ल्ड प्रीमियर २०१२ मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘सिटी टू सिटी’ प्रोग्राममध्ये झाला होता. मुंबई चित्रपट महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ स्टुटगार्ट, दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलसह इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये तो दाखवण्यात आला. मुंबई चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ‘सिल्व्हर गेटवे ट्रॉफी’ देण्यात आली होती. हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०१३ रोजी भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राजकुमार रावला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ आणि हंसल मेहता यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अपूर्व यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “राष्ट्रीय पुरस्कार विजेता शाहिद अखेर प्राइम व्हिडीओवर रिलीज होतोय. आमच्या चित्रपटाला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी १३ वर्षे लागली. ‘शाहिद’ ही दहशतवादविरोधी कायद्यांखाली आरोपी असलेल्या लोकांचा बचाव करणाऱ्या आणि मुस्लिमांना निर्दोष सिद्ध होण्यापूर्वीच दोषी मानल्या जाणाऱ्या वातावरणात कायदेशीर प्रक्रियेसाठी लढा देणाऱ्या ‘शाहिद आझमी’ या वकिलाची कथा सांगते. यासाठीच त्यांची हत्या करण्यात आली होती.”

पुढे ते म्हणाले, “‘शाहिद’ चित्रपटाला इतकी वर्षे ओटीटी प्लॅटफॉर्म का मिळाला नाही? याचं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं. हा चित्रपट २०१४ च्या आधी एक वर्षाआधी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर राजकीय वातावरण असं झालं, ज्यात विरोधक, कार्यकर्ते, पत्रकार आणि आरोपींच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्यांकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. याच काळात उमर खालिद यांच्यासारख्या लोकांनी खटल्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे तुरुंगात घालवली आहेत.”