Rajkummar Rao Toaster Movie OTT Release : राजकुमार राव बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत विविध कथानकं असलेल्या चित्रपटांतून काम केलं आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून त्यानं वेगळी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. विविध जॉनरच्या चित्रपटांत त्यानं काम केलं आहे. अशातच आता लवकरच राजकुमार रावचा एक सिनेमा ओटीटीवर येणार आहे.
राजुकमार राव नेहमीच चौकटीबाहेरच्या गोष्टी त्याच्या चित्रपटांतून सांगत असतो. तेच तेच करण्यापेक्षा दरवेळी वेगवेगळे प्रयोग करताना तो दिसतो. कॉमेडी, गंभीर असे विविध रोल त्यानं साकारले आहेत. अशातच आता अभिनेत्याचा एक डार्क कॉमेडी चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री सान्या मल्होत्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट कोणता आहे आणि ओटीटीवर कधी व कुठे पाहायला मिळणार आहे जाणून घेऊयात…
बॉलीवूडमधील अनेक कलाकार हल्ली ओटीटीवरील त्यांच्या कलाकृतींमुळे चर्चत असतात. अनेक जण आता ओटीटीला पसंती देताना दिसत आहेत. राजकुमार रावही यामध्ये मागे राहिलेला नाही. अभिनेत्याचा ‘टोस्टर’ हा डॉर्क कॉमेडी चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे राजकुमार व त्याची पत्नी पत्रलेखा यांनीच सिनेमाची निर्मिती केली आहे. विवेक दास चौधरी दिग्दर्शित ‘टोस्टर’ हा चित्रपट माध्यमांच्या वृत्तानुसार थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवरच रिलीज होणार आहे.
ओटीटीवर कधी होणार रिलीज?
राजकुमार राव व सान्या मल्होत्रा यांचा ‘टोस्टर’ हा चित्रपट १५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. नेटफ्लिक्सनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये राजकुमार रावनं स्वत: चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेता म्हणाला, “यावेळी मी कुठला मोनोलॉग बोलणार नाहीये, तर स्पष्टपणे चित्रपटाची माहिती देणार आहे.” राजकुमार पुढे म्हणाला, “आमच्या चित्रपटाचं नाव आहे टोस्टर आणि चित्रपट १५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर येत आहे. यामध्ये माझ्या पात्राचं नाव आहे आरके. राजकुमार राव नाही. रमाकांत. तो खूप काटकसरी आहे.”
मराठी कलाकारांची वर्णी
चित्रपटाबद्दलची माहिती देत अभिनेता पुढे म्हणाला, “चित्रपटाची निर्माती आहे माझी प्रिय पत्नी आणि उत्तम अभिनेत्री पत्रलेखा आणि आमच्या चित्रपटात एकापेक्षा एक चांगले कलाकार आहेत. सान्या मल्होत्रा, अर्चना पूरण सिंह, फराह खान, अभिषेक बॅनर्जी, सीमा पाहवा, उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, विनोद रावत आणि पर्नलेखा.”
राजकुमार राव पुढे म्हणाला, “टोस्टर हा आमचा चित्रपट आहे, आम्ही त्याची निर्मिती केली आहे. पत्रलेखा आणि मी त्याचे निर्माते आहोत.” राजकुमार रावची निर्मिती असलेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी व उपेंद्र लिमये हे मराठी कलाकारही झळकणार आहेत. व्हिडीओच्या शेवटी चित्रपटातील कलाकारांची झलक पाहायला मिळते.
