आक्षेपार्ह दृश्यांमुळे चर्चेत राहिलेला जान्हवी कपूर व राम चरण यांचा ‘पेद्दी’ चित्रपट लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. ‘पेड्डी’ ४ जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. अवघ्या दीड महिन्यात हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटगृहांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता ‘पेड्डी’ ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

ज्यांनी जान्हवी कपूर व राम चरणचा हा चित्रपट थिएटर्समध्ये पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. ‘पेड्डी’ १६ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल, असं म्हटलं जातंय. पण निर्मात्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘पेड्डी’मधील कलाकार व बॉक्स ऑफिस कलेक्शन

या चित्रपटात राम चरण मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बाबू, दिव्येंदु, बोमन इराणी, रवी किशन, विजी चंद्रशेखर, रजातवा दत्ता, सत्य, जॉन विजय, अजय घोष हे कलाकार आहेत. ‘पेड्डी’ने भारतात आतापर्यंत २४०.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कलेक्शन ३३७.२५ कोटी रुपये झाले आहे.

‘पेड्डी’ चित्रपट रिलीज होताच त्यावर टीकेचा भडिमार उठला होता. चित्रपटात जान्हवीने ‘अच्चियम्मा’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये तिला एखाद्या वस्तूप्रमाणे ऑब्जेक्टिफाय करण्यात आलंय. इतकंच नाही तर मुख्य अभिनेत्याकडून तिच्यावर अत्याचार होतानाही दाखवलं गेलं आहे. एका सीनमध्ये राम चरण संमतीशिवाय तिला किस करतो. त्यानंतर जेव्हा अच्चियम्मा रडू लागते, तेव्हा एक एक पुरुष पात्र तिच्या वडिलांच्या राजकीय करिअरचा विचार करून तिला ही गोष्ट विसरून जाण्यास सांगतो.

जान्हवी कपूरने पोस्ट-प्रोडक्शनवेळी, चित्रपट एडिट होत असताना वेळी अशा शॉट्सवर स्पष्टपणे आक्षेप घेतला होता. चित्रपटसृष्टीत महिलांचे अति-लैंगिकीकरण करण्याविरोधात तिने घेतलेल्या जाहीर भूमिकेसारखीच भूमिका तिने घेतली होती. तसेच ती निर्मात्यांशीही याबद्दल बोलली होती, पण तरीही शेवटच्या एडिटिंगमध्ये ते सीन्स तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे, इथे अभिनेत्रीने स्वतःसाठी आवाज उठवला नाही, असं घडलेलं नाही. तर, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिच्या संमतीपेक्षा बॉक्स ऑफिसच्या कमाईला जास्त महत्त्व दिलं आणि तिच्या म्हणण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय, अशी चर्चाही झाली होती.