सध्या नेटफ्लिक्सवर अनेक नवीन आणि जुने चित्रपट ट्रेंड होत आहेत, पण एका ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. जर तुम्हाला ‘क्राईम थ्रिलर’ चित्रपट पाहण्याची आवड असेल, २ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट तुमच्या नक्कीच पसंतीस पडेल.

या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना हादरवून सोडणारी आहे. याआधी चित्रपटाचे दोन भाग आले आहेत आणि या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यानंतर आता तिसऱ्या भागावरसुद्धा प्रेक्षकांनी तेवढेच प्रेम केले आहे. हा चित्रपट म्हणजे राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’.

चित्रपटगृहांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपटगृहांप्रमाणेच ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि आता चित्रपटाने नेटफ्लिक्सवरही आपली जादू कायम ठेवली आहे.

Award Banner

२ तास ९ मिनिटांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असून प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे. ‘मर्दानी ३’ चित्रपट नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ यादीत पहिल्या स्थानावर आहे.

२७ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आयएमडीबी (IMDb) वर ७.१ रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

rani mukerji crime thriller movie mardaani 3 trending no 1
‘मर्दानी ३’ने ओटीटीवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’लाही टाकलं मागे

‘मर्दानी ३’ची कथा पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयभोवती फिरते. राणी मुखर्जीने ही भूमिका साकारली आहे. तिच्याकडे लहान मुलींच्या अपहरणाची एक केस येते. या केसचा तपास करताना शिवानी आपले सर्वस्व पणाला लावते. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे या अपहरणांमागे एका ‘भिकारी माफिया’चा हात असल्याचे समोर येते, ज्याला सर्वजण ‘अम्मा’ या नावाने ओळखतात.

पुढे तपासात असे धक्कादायक वास्तव समोर येते की, तब्बल ९३ मुली बेपत्ता आहेत आणि त्यांचा कोणताही सुगावा लागत नाहीये. या मुलींना शोधण्यासाठी आणि ‘अम्मा’चा पर्दाफाश करण्यासाठी शिवानी रॉय लढा देते. पुढे या लढ्याचा शेवट काय होतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहावा लागेल.

या चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉयची भूमिका नेहमीप्रमाणेच ताकदीने साकारली आहे, तर ‘अम्मा’च्या भूमिकेत मल्लिका प्रसाद यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘मर्दानी’चे दोन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले होते.