Rani Mukerji Mardaani 3 Netflix Success: राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सच्या जोडीने बॉलीवूडमध्ये असा इतिहास रचला आहे, जो पुढील अनेक वर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. ‘मर्दानी ३’ प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्स इंडियावर एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली आहे. या फ्रँचायझीचे तिन्ही चित्रपट— ‘मर्दानी’, ‘मर्दानी २’ आणि ‘मर्दानी ३’ एकाच वेळी टॉप-१० ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील झाले आहेत. ‘मर्दानी ३’ (२०२६) पहिल्या क्रमांकावर आहे, ‘मर्दानी’ पाचव्या आणि ‘मर्दानी २’ सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ‘मर्दानी’ ही भारताची सर्वात यशस्वी महिला प्रधान पोलीस फ्रँचायझी बनली आहे.

एकाच वेळी, एकाच नावाचे तीन चित्रपट ट्रेंडिंग

सीक्वल फक्त अभिनेत्यांच्या ॲक्शन चित्रपटांपुरतेच मर्यादित आहे, असं बॉलीवूडमध्ये अनेकदा म्हटलं जातं. पण राणी मुखर्जीने हा विचार मोडीत काढला. नेटफ्लिक्सवर एकाच नावाचे तीन चित्रपट ट्रेंड करणे हा बॉलिवूडच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद क्षण आहे. ‘मर्दानी ३’ च्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षक पुन्हा जुन्या भागांकडे वळले आहेत. यावरून ‘शिवानी शिवाजी रॉय’ हे पात्र लोकांच्या मनात किती खोलवर रुजले आहे, हे दिसून येतं.

बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला मर्दानी ३

पहिला चित्रपट ‘मर्दानी’ पाचव्या क्रमांकावर तर ‘मर्दानी 2’ सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. ‘टॉप 10’ यादीत एकाच फ्रेंचायझीचे तीन चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहेत. OTT वर येण्यापूर्वी ‘मर्दानी ३’ थिएटरमध्येही यशस्वी ठरला. या चित्रपटाने भारतात ५३ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ही या फ्रँचायझीमधील आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. आजच्या काळात जेव्हा मोठे चित्रपट दोन आठवड्यांतच थिएटरमधून बाहेर पडतात, तेव्हा ‘मर्दानी ३’ ने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत.

Award Banner

‘मर्दानी’ फ्रेंचायझीचं यश हे थिएटर आणि OTT यांच्यातील उत्तम ताळमेळाचं उदाहरण आहे. जेव्हा एखादा चित्रपट थिएटरमध्ये गाजतो, तेव्हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर त्याची मागणी वाढते. अभिनेत्यांचा दबदबा असलेल्या पोलीस ड्रामा कॅटेगरीत राणी मुखर्जीने स्वतःची एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये राणीने अनेक उत्तम भूमिका केल्या आणि आजही ती स्वतःचा चाहतावर्ग टिकवून आहे.

तीन दशकांच्या या प्रवासात बॉक्स ऑफिसवर आपली पकड टिकवून ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. निर्भीड आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिग्दर्शक अभिराज मीनावाला आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनी गेल्या १२ वर्षांत ही फ्रेंचायझी हिट करून दाखवली आहे.