Rani Mukerji Movie Trending On OTT : ओटीटीमुळे मनोरंजन अगदी सहज उपलब्ध झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. ओटीटी माध्यमांमुळे घरबसल्या प्रेक्षक अनेक कलाकृतींचा अगदी सहज आनंद घेऊ शकतात. अनेक जण जुने सिनेमेसुद्धा पाहतात. अशातच एका सात वर्षांपूर्वीच्या सिनेमाची सध्या ओटीटीवर चर्चा सुरू आहे आणि हा सिनेमा म्हणजे ‘मर्दानी २’. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही जुने चित्रपट पुन्हा लोकांच्या पसंतीस येताना दिसतात. खासकरून क्राइम-थ्रिलर जॉनरचे सिनेमे आता प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होऊ लागले आहेत. अशातच राणी मुखर्जीचा सात वर्षांपूर्वीचा जुना सिनेमा अचानक ट्रेंडिंगमध्ये आला आहे. त्यामुळे सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुम्हीसुद्धा क्राइम-थ्रिलर जॉनरचे चाहते असाल, तर हा सिनेमा तुम्हालादेखील नक्कीच आवडू शकतो.
राणी मुखर्जी ‘मर्दानी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच तिच्या ‘मर्दानी २’ने ओटीटीवर टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये आपली जागा मिळवली आहे. २७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा ४७ कोटींची कमाई केली होती. तर सिनेमाची जगभरातील एकूण कमाई ६७ कोटी इतकी होती. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला जमवलेला हा सिनेमा आता सात वर्षांनी ओटीटीद्वारेसुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळविताना दिसत आहे.
‘मर्दानी ३’ची चर्चा सुरू असतानाच प्रेक्षक पुन्हा ‘मर्दानी २’ ओटीटीवर बघत आहेत. ‘मर्दानी ३’ पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा ओटीटीवर ‘मर्दानी २’ पुन्हा बघत आहेत, असंही म्हटलं जात आहे. ‘मर्दानी २’मध्ये व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत बलात्काऱ्याच्या अस्वस्थ करणाऱ्या मानसिकतेचं चित्रण करण्यात आलं आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
दरम्यान, राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘मर्दानी ३’ सिनेमा नुकताच ३० जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमातून अभिनेत्री पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘मर्दानी ३’ या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
तीन महिन्यांत ९३ मुली गायब झाल्याचं जेव्हा शिवानीला समजतं, तेव्हा ती कसून तपास सुरू करते. त्यातच तिला एका आरोपीकडून कुसुमपूरच्या अम्माबद्दल समजतं. आठ-नऊ वर्षांच्या गरीब घरातील मुलींचं अपहरण करून अम्मा त्यांचं काय करते, याचा छडा शिवानीला लावायचा आहे.

