राणी मुखर्जी ही बॉलिवूडमधील एक गुणी अभिनेत्री आहे. 'राजा की आयेगी बारात' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटातून तिचा ग्लॅमरस अंदाज समोर आला. तिने प्रसिद्ध निर्माता व दीगदारसगक आदित्य चोप्राशी लग्नगाठ बांधली. आदित्य चोप्रा हा दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रांचा मोठा मुलगा. नुकतंच 'पठाण'सारखा सुपरहीट चित्रपट देत शाहरुख खानबरोबरच यश राज फिल्म्सनेही जबरदस्त कमबॅक केले. नुकतंच राणी मुखर्जीनी आदित्य चोप्राच्या या यशाबद्दल भाष्य केलं आहे. राणीने नुकतंच मुंबईमध्ये एफआयसीसीआय'च्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली त्यावेळी राणीने आदित्य चोप्राच्या स्वभावाबद्दल आणि कोविडकाळात त्याने दाखवलेल्या संयमाबद्दल भाष्य केलं आहे. कोविड काळात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जाळ्यात न अडकता आदित्य चोप्राने स्वतःच्या चित्रपटांचा बचाव कसा केला याबद्दल राणीने सविस्तर भाष्य केलं आहे. आणखी वाचा : चार वर्षं रखडलेल्या अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित 'मैदान' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर राणी म्हणाली, "कोविडदरम्यान आदित्यचे हे काही बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. दुर्दैवाने कोविड आला अन् या सगळ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यावेळी चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत चर्चाही होत नव्हती. त्यावेळी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा दबाव हा बऱ्याच सिनेनिर्मात्यांवर होता अन् बरेच निर्माते तशी पावलंही उचलत होते. मोठ्यातला मोठा चित्रपट हा ओटीटीवर येत होता अन् माझा पती हा फार शांत होता." पुढे राणी म्हणाली, "माझ्या नवऱ्याकडे हा आत्मविश्वास होता की हे सर्व चित्रपट मोठ्या पडद्यासाठीच बनले आहेत जेणेकरून लोक एकत्र येऊन त्यांचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे त्याने हे चित्रपट थेट चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा निर्णय घेतला. हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी त्याला बऱ्याच लोकांनी भरपुर पैशांची ऑफर दिली जेणेकरून त्या दोघांचा फायदा झाला असता पण त्याने तसं नाही केलं." २०२३ च्या सुरुवातीलाच 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. शाहरुख खानने या चित्रपटातून कमबॅक केलंच पण आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्स यांच्या आत्मविश्वासातही आणखी भर पडली अन् त्यांनी पुढे याचं 'स्पाय युनिव्हर्स' करायचाही निर्णय घेतला.