Uttar Marathi Movie On OTT : आईशिवाय आपलं कोणतंच काम पूर्ण होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आई हवी असते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका आई आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत असते. आपल्या लेकराचं भलं कशात आहे हे फक्त आईलाच माहीत असतं! अशीच आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘उत्तर’.
सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. १२ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात ‘उत्तर’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘धुरंधर’ आणि ‘अवतार’ यांसारख्या बिग बजेट सिनेमांमुळे ‘उत्तर’ चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा निर्माण झाली होती, अनेक ठिकाणी शोज देखील कमी करण्याच आले होते. पण, तरीही या सिनेमाचे निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने कोणतीही तक्रार न करता आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याची काळजी घेतली.
‘उत्तर’ सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला. काही दिवसांनी थिएटर हाऊसफुल झाली, चित्रपटात आई-मुलाचं नातं पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. ज्यांनी हा हृदयस्पर्शी सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नाहीये किंवा ज्यांना हा चित्रपट पुन्हा पाहायचाय अशा सगळ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
‘उत्तर’ चित्रपट ओटीटीवर…
‘उत्तर’ सिनेमा आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना घरबसल्या हा सिनेमा पाहता येईल. येत्या १३ फेब्रुवारीला हा चित्रपट ZEE 5 वर लॉन्च केला जाईल. “काही प्रश्नांची ‘उत्तरं’ सांगितली जात नाहीत तर ती शोधावी लागतात…पाहायला विसरू नका ‘उत्तर’ १३ फेब्रुवारीपासून फक्त आपल्या मराठी ZEE5 वर” असं कॅप्शन देत ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
या पोस्टवर कमेंट्स करत, “हा सुंदर सिनेमा पुन्हा एकदा पाहायला नक्की आवडेल” असं एका युजरने म्हटलं आहे. या सिनेमात रेणुका शहाणे यांनी आईची भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका सिनेमात अभिनेता अभिनय बेर्डेने साकारली आहे. याशिवाय हृता दुर्गुळे सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

