Raja Shivaji OTT Release Date Netflix: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि या चित्रपटाने बॉक्सही गाजवले. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार? ते जाणून घेऊयात.

‘राजा शिवाजी’ ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार?

‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक व रेकॉर्डब्रेक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल तर तो आता घरबसल्या पाहू शकाल. कारण आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. एबीपी लाइव्हच्या वृत्तानुसार, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ जून रोजी रिलीज होणार आहे. मात्र, प्लॅटफॉर्मकडून अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘राजा शिवाजी’ चित्रपटाने आपल्या ७५ कोटींच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने भारतात एकूण ११० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींचा टप्पा पार करणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला होता. तसेच जगभरात या चित्रपटाने ११४.८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे. रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या सिनेमात त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकाही साकारली आहे. चित्रपटात हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. त्यामध्ये संजय दत्त, जिनिलीया देशमुख, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. तसेच, या चित्रपटात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खाननेही कॅमियो केला आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आणि त्यांच्या अफाट शौर्याची ऐतिहासिक गाथा मोठ्या पडद्यावर मांडतो.