रितेश देशमुख व फराह खान सूत्रसंचालन करत असलेला ‘लॉक अप सीझन २’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ओटीटीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी हा एक असून आता अखेर हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अभिनेता हर्षद चोप्रा हा शोचा पहिला फायनलिस्ट ठरला. तर, अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुखने शोमधील आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रितेशने याबद्दल सांगितलं आहे. रितेश देशमुखसाठी रिअॅलिटी शो होस्ट करणं काही नवीन नाही. यापूर्वी त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आणि सहाव्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं आहे. मात्र, ‘लॉक अप: सच या सजा’ हा शो त्याच्यासाठी कसा वेगळा आहे, याबद्दल बोलताना तो म्हणाला, “प्रत्येक रिअॅलिटी शोचा एक ठरावीक फॉरमॅट असतो आणि त्यानुसारच सूत्रसंचालन करावं लागतं. अर्थात, फराह आणि मी आमच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि विनोदबुद्धीमुळे शोमध्ये वेगळी ऊर्जा घेऊन येतो. सूत्रसंचालक म्हणून प्रत्येक स्पर्धकाचा दृष्टिकोन आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचं आम्हाला ठावूक आहे. मला वाटतं, फराह आणि मी अनेक बाबतीत वेगळे आहोत, पण काही बाबतीत आमच्यात खूप साम्यही आहे.”
याबाबत पुढे बोलताना रितेश देशमुख म्हणालेा, “लॉक अप’मध्ये आम्ही स्पर्धकांशी दररोज संवाद साधतो. इतर बहुतांश रिअॅलिटी शोमध्ये संपूर्ण आठवड्याचा आढावा घेतला जातो, पण इथे घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा आम्ही त्याच वेळी भाग असतो. त्यामुळे इथे घडणाऱ्या गोष्टी अगदी जवळून अनुभवता येतात. प्रत्येक स्पर्धकाची बाजू आणि त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं असतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक खोलवर दडलेली रहस्यं आणि अनुभव समजून घेण्यासाठी खूप संवेदनशीलता लागते. हा खेळ खूप कठीण आहे. स्पर्धकांना दररोज भावनिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागतो”.
‘फक्त ओरडणं सूत्रसंचालकाचं काम नसतं’ – रितेश
‘लॉक अप’मध्ये रितेश देशमुख दररोज जेलरच्या भूमिकेत स्पर्धकांसमोर येत होता. कधी नवीन टास्कची माहिती देण्यासाठी, तर कधी खेळातील नवीन ट्विस्ट उलगडण्यासाठी तो घरात प्रवेश करायचा. स्पर्धक वरुण यादवबरोबरची त्याची जुगलबंदीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. मात्र, शोमध्ये सगळंच मजेशीर नव्हतं. अनेकदा तणावपूर्ण प्रसंगांचाही सामना करावा लागला. पहिल्या आठवड्याच्या शेवटी स्पर्धक राम कपूरने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रितेशने त्याची समजूत काढत संयम ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्याला निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितलं.
तसंच, स्पर्धक योगेश रावतने तो आधी शोमधून बाहेर पडला होतो, पण टीआरपी घसरल्यामुळे पुन्हा शोमध्ये आणलं गेलं, असा दावा केला होता. त्यावर रितेशने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “हा मंच स्पर्धकापेक्षा मोठा आहे.” शोमध्ये सतत बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करताना सूत्रसंचालक म्हणून कोणती भूमिका निभवावी लागते, याबद्दल रितेश देशमुख म्हणाला, “अनेक स्पर्धकांना एका टप्प्यानंतर आता पुरे झालं, पुन्हा हा खेळ खेळायचा नाही, असं वाटू लागतं. अशावेळी त्यांना पुन्हा उभारी देणं, प्रेरित करणं आणि खेळ सुरू ठेवण्यासाठी तयार करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे सूत्रसंचालकाचं काम फक्त न्यायाधीशासारखं ओरडणं नसतं.”
तो पुढे म्हणाला, “हो, काही गोष्टी स्पष्टपणे सांगणं आवश्यक असतं आणि त्या बाबतीत आम्ही ठाम असतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला समजून घेणं. प्रत्येकाची मानसिकता आणि स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे मी प्रत्येकाशी एकाच पद्धतीने वागू शकत नाही. फराह आणि मी प्रत्येक स्पर्धकानुसार त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो.”
दरम्यान, हर्षद चोप्रासह शिवांगी जोशी, योगेश रावत, शिल्पा शिंदे, राम कपूर, श्रेया कलरा आणि वरुण यादव यांनी ‘लॉक अप’च्या अंतिम आठवड्यात स्थान मिळवलं आहे.
