रितेश देशमुखने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. रितेशसह त्याची पत्नी जिनिलीया देशमुखची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी रितेश न्यूयॉर्कमधील एका आर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत होता. रितेशचे वडील विलासराव देशमुख त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे वडील मुख्यमंत्री असल्याने रितेशला सिनेविश्वात काम मिळतंय असे टोमणे त्याला अनेकांकडून ऐकायला मिळाले. पण, या काळात रितेश जराही खचला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी गेल्या काही वर्षांत प्रचंड मेहनत घेतली.

रितेश ‘लॉकअप’ शोमध्ये याबद्दल सांगतो, “मी जेव्हा माझा पहिला सिनेमा केला त्यावेळी माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळी मी या इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा काहीजण बोलायचे…याचे वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला काम मिळतंय. त्यांच्यामुळेच याचे सिनेमे चालतात. गेल्या २३ वर्षांत ६० सिनेमे केले आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्याबद्दल जे काही बोललं गेलं, जे काही टॅग मला दिले गेले… ते सगळे मी मोडून काढलेले आहेत.”

“या सगळ्याला वेळ द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत केल्यावर यात नक्कीच तुम्हाला यश मिळतं.” असं रितेशने सांगितलं.

याशिवाय अभिनेत्याने रडणाऱ्या सुनीता आहुजांना देखील धीर दिला आहे. सुनीता आहुजा त्याला म्हणाल्या, “मला गेम व्यवस्थित खेळता येत नाहीये. मला टास्कदरम्यान दुखापतही झालीये. या सगळ्यामुळे मी खूप जास्त इमोशनल होतेय…त्यामुळे मला जर तुम्ही एलिमिनेट केलं तर फार चांगलं होईल.” यानंतर सुनीता ढसाढसा रडू लागल्या. त्यांना पाहून रितेश लगेच त्यांच्याजवळ गेला आणि त्याने सुनीता यांना धीर दिला.

रितेशच्या या कृतीने सध्या सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. “तो खरा जेंटलमन आहे”, “रितेशसारखा होस्ट कधीच मिळणार नाही, त्याच्यावर खूप चांगले संस्कार आहेत…सर्वांना समजून घेतोय” अशा प्रतिक्रिया सध्या नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. याशिवाय रितेशच्या लॉकअप शोच्या होस्टिंगचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अभिनेत्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.