Riteish Deshmukh Masti 4 on OTT : रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय व आफताब शिवदासानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मस्ती 4’ काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय व आफताब शिवदासानी यांचा अ‍ॅडल्ट कॉमेडी असलेला ‘मस्ती ४’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे.

२००४ मध्ये ‘मस्ती’ फ्रँचायजीची सुरुवात झाली. त्यामध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय व आफताब शिवदासानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘मस्ती’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला होता. २१ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता तो लवकरच ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.

ETimes नुसार, हा अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट येत्या १६ जानेवारी २०२६ पासून ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सबस्क्रायबर्सना अतिरिक्त शुल्क न देता हा चित्रपट पाहता येईल.

‘मस्ती ४’चे एकूण कलाकार

सिनेमाच्या मुख्य कलाकारांमध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, अर्शद वारसी, तुषार कपूर, नर्गिस फाखरी, रूही सिंह, श्रेया सिंह, शाद रंधावा, नतालिया जानोसजेक, तारा सुमनेर व एलनाज नौरोजी आहेत.

‘मस्ती ४’ चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. तर, ए. झुनझुनवाला, शिखा करण अहलुवालिया, इंद्र कुमार, अशोक ठाकेरिया, शोभा कपूर, एकता कपूर व उमेश बन्सल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

‘मस्ती’ फ्रँचायझीचा इतिहास

‘मस्ती’ फ्रँचायजीचा पहिला सिनेमा २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१३ मध्ये ‘ग्रँड मस्ती’ व २०१६ मध्ये ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ सिनेमा आला. त्यानंतर गेल्या वर्षी ‘मस्ती ४’ प्रदर्शित झाला. ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त १५.१४ कोटींची कमाई केली. CBFC ने ‘मस्ती ४’ला ‘ए’ सर्टिफिकेट दिले, ज्यामुळे १८ वर्षांपेक्षा मोठे प्रेक्षकच थिएटर्समध्ये हा सिनेमा पाहू शकले.

दरम्यान, रितेश होस्ट करीत असलेला ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझनसुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ११ जानेवारी रोजी शोचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. टीव्ही मालिका आणि सिनेमांमधले कलाकार ते सोशल मीडियावरील अनेक स्टार्सनी यंदाच्या सीझनमध्ये सहभाग घेतला आहे. एकूण १७ स्पर्धक यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.