येत्या काळात दिवाळीत अनेक नवनवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या नवीन चित्रपटाचाही समावेश आहे. त्या मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट कधी व कुठे रिलीज होणार आहे आणि यामध्ये त्यांच्याबरोबर कोणते कलाकार झळकणार आहेत जाणून घेऊया.
दिग्दर्शिका राधिका बन्सल यांनी ‘मीठे में क्या है’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांच्यासह ऋत्विक भौमिक, आयेशा रझा मिश्रा, अभय कौल, तराना राजा, गौरव के. शर्मा, विक्रम बक्षी यांच्यासह इतर कलाकार झळकणार आहेत. ‘मीठे में क्या है’ या चित्रपटाची कथा दिवाळीच्या चार दिवसांतील घडामोडींवर आधारित आहे.
कधी रिलीज होणार
हा चित्रपट ३० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सणासुदीच्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या हलक्याफुलक्या कौटुंबिक चित्रपटाचं पहिलं पोस्टर निर्मात्यांनी प्रदर्शित केलं आहे. उत्थान कॅपिटल प्रस्तुत आणि अजित मोहन निर्मित या चित्रपटातून दिवाळीच्या उत्सवी वातावरणाची झलक पाहायला मिळते.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतं. यातून सणासुदीच्या काळात कुटुंबीय एकत्र आल्यावर निर्माण होणारा आनंद आणि उत्साह दिसून येतो. विनोद आणि भावनांची सांगड घालणारा ‘मीठे में क्या है’ हा चित्रपट नातेसंबंध, कुटुंबातील समीकरणं आणि एकत्र वेळ घालवण्याचा आनंद यावर आधारित आहे. यामध्ये काही नाट्यमय प्रसंगही पाहायला मिळणार आहेत. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांनी एकत्र बसून पाहावा, असा हा हलकाफुलका आणि मनोरंजक चित्रपट आहे.
महत्त्वाचं म्हणजे राधिका बन्सलचा हा पहिलाच चित्रपट असून यामधून ती दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. तर तिनेच याचं लिखानही केलं आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये रोहिणी हट्टंगडी आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत असून या पोस्टरला “या दिवाळीला घरी या. आजीचं घर आनंद आणि भेटवस्तुनी तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
