Salman Khan on Riteish Deshmukh : ‘प्राइम’वर प्रदर्शित होणारा ‘अलायन्स’ हा रिअॅलिटी शो जोरदार चर्चेमध्ये आला आहे. त्याचे कारण म्हणजे यामध्ये अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आहे. ‘अलायन्स’मध्ये सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, त्याला भेटण्यासाठी सलमान खान आला आहे. ‘अलायन्स’मधील हेडक्वार्टरमध्ये सलमान आल्यानंतर सर्व स्पर्धक आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता आणखी एक प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये त्याने लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुखचे नाव घेतले आहे. सोशल मीडियावर ‘अलायन्स’चा हा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.

सोहेल खान ‘अलायन्स’मध्ये सहभागी झाल्यापासून या शोमध्ये सलमान खान येण्याची चर्चा रंगली होती. आता भावाला भेटण्यासाठी सलमान शोमध्ये आला आहे. त्यानंतर सोहेलने त्याला भावनिक मिठी मारल्याचे दिसून आले आहे. सोहेलने भावासमोर त्याच्या भावना व्यक्त केल्याचे प्रोमोमध्ये दिले. त्या प्रसंगी सोहेल म्हणतो, “आज मी खूप घाबरलो होतो.” त्यानंतर स्टोअररूमच्या दरवाजावर रागाच्या भरात लाथा मारल्याचेही त्याने भावाला सांगितले. त्यानंतर सलमानने स्पर्धकांना विचारले, “तुम्ही सोहेलला खूप स्ट्रेस देत आहात का?”

सलमान खाननं घेतलं रितेश देशमुखचं नाव

याच प्रोमोमध्ये सलमान खानने अभिनेता रितेश देशमुखचे नाव घेऊन मजेशीरपणे वक्तव्य केल्याचे दिसून आले. सलमान म्हणतो, “मला वाटतं रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आली आहे.” सलमानने हे वक्तव्य नेमके कोणत्या संदर्भात केले, ते अजून समोर आलेले नाही; पण सलमान खानने रितेश देशमुखचा मस्करीत उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. सलमानचे हे वक्तव्य नेमके कशा संदर्भात होते, याचा खुलासा आता एपिसोड रिलीज झाल्यानंतर होईल. पण सलमान सहभागी झाल्याने ‘अलायन्स’च्या या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमान खान व रितेश देशमुखची मैत्री

रितेश देशमुख हा सध्या ‘लॉक अप : सच या सजा’ या शोमुळे चर्चेमध्ये आला आहे. ‘नेटफ्लिक्स’वरील या शोमध्ये रितेश हा फराह खानसह सूत्रसंचालन करीत आहे. लॉक अप हा रिअॅलिटी शोसुद्धा जोरदार चर्चेमध्ये असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रितेश देशमुख व सलमान खान यांच्यातील मैत्री तर सर्वांना माहीत आहे. सलमानने रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये कॅमिओ रोल साकारला आहे. नुकताच १०० कोटींचा टप्पा पार केलेल्या रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमामध्येही सलमान खान झळकला होता. त्यामध्ये सलमानने जिवा महाले यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्येही सलमान सहभागी झाला होता. त्यानंतर आता सलमानने ‘अलायन्स’मध्ये रितेश देशमुखचा उल्लेख केल्याने प्रोमो व्हायरल होत आहे.